तूर व चना खरेदीसाठी नाफेडकडून खरेदी केंद्र सुरू Ø शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

तूर व चना खरेदीसाठी नाफेडकडून खरेदी केंद्र सुरू

Ø शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 9 : नाफेडच्यावतीने 28 मार्चपासून तूर व चना खरेदीस सुरवात करण्यात आली आहे. 25 जून 2024 पर्यंत तूर व चना खरेदी करता येणार आहे. याकरिता 5 केंद्रे सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस. तिवाडे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत हंगाम 2023-24 मध्ये तूर व चना खरेदीस नाफेडच्या वतीने मान्यता दिली आहे. त्यानुसार 28 मार्च पासुन तुर व चना खरेदी करीता शेतकरी नोंदणी सुरु झाली आहे. नोंदणी करण्यासाठी येतांना शेतक-यांनी सोबत ई-7/12, चालुखाते असलेले बँक पासबुक, आधारकार्ड, आठ अ प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. यामुळे शेतक-यांना हमीभावाने तुर व चना विकता येणार आहे.

            नाफेडतर्फे जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, गडचांदुर, चिमुर, वरोरा अशी 5 खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर खरेदी केंद्रासोबत पोंभुर्णा, सावली, मूल, राजुरा केंद्रासोबत बल्लारपुर आणि गोंडपिपरी, गडचांदुर केंद्रासोबत कोरपणा आणि जिवती, चिमुर केंद्रासोबत ब्रम्हपुरी, सिंदेवाही आणि नागभिड तर वरोरा केंद्रासोबत भद्रावती तालुका जोडण्यात आला आहे. तालुकानिहाय केंद्रांवर शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. तरी नाफेडने ठरवून दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी आपली जवळच्या केंद्रावर जाऊन तूर व चना विक्री व नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.