विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याला अग्रेसर ठेवणे हेच प्राधान्य  – पालकमंत्री वडेट्टीवार

विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्याला अग्रेसर ठेवणे हेच प्राधान्य  – पालकमंत्री वडेट्टीवार

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 16 : चंद्रपूर जिल्हा विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहावा यासाठी लोकसहभागातून तसेच प्रशासनाच्या सहकार्यातून आगामी काळातील ध्येयधोरणे राबविली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीन विकास हेच आपले पहिले प्राधान्य आहे, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी दिलेल्या संदेशात व्यक्त केले.

यावेळी जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार यांच्यासह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते तसेच जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच आलेल्या पूरपिडीतांना शासनाने 11 हजार 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. विदर्भातील नुकसानग्रस्त शेतक-यांना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मदत जाहीर करण्यात आली आहे.

‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती’ योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 53 हजार 709 शेतक-यांच्या खात्यांवर कर्जमाफीचे 314 कोटी 63 लाख रुपये जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 79 हजार 155 शेतक-यांना 626 कोटींचे वाटप करण्यात आले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अधिक भाव देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. जिल्ह्यात 26 हजार शेतक-यांकडून 7 लक्ष 98 हजार 539 क्विंटल धान तर रब्बी हंगामात 1816 शेतक-यांकडून 72 हजार 197 क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. 

हायब्रिडी ॲन्युईटी तत्वावर 2436 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रस्ते, पूल, इमारती बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 1200 वीज ग्राहकांना पारंपरिक पध्दतीने तसेच सौर कृषी पंपाद्वारे 1280 शेतक-यांना नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. मनरेगा योजनेंतर्गत कोरोनाकाळात चंद्रपूर जिल्हा मजूर उपस्थितीच्या बाबतीत राज्यात दुस-या क्रमांकावर होता. डीजीटल अध्ययन व शाळा सुरक्षितता आणि बाल संरक्षण या मुल्यमापणात चंद्रपूर जिल्ह्याला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.

पुढे ते म्हणाले, जिल्ह्यातील 30 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून दररोज 3300 याप्रमाणे आतापर्यंत सुमारे 18 लक्ष 5 हजार 100 नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या 20 हजार नागरिकांना खावटी अनुदान योजनेचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यात महाआवास योजनेंतर्गत आतापर्यंत 31 हजार 511 घरकुल पूर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत जिल्ह्यात 600 जणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

गोसेखुर्द प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास एक लक्ष हेक्टरवर सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे. तसेच बंद पडलेल्या उद्योगांना चालना देण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात सिध्दपल्ली, मुरली सिमेंट, ग्रेस, एम्प्टा माईन्सचा समावेश असून जिल्ह्यातील जवळपास 2 हजार बेरोजगारांना रोजगार मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. वर्धा आणि पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आणि साक्षात पंढरीचे तीर्थक्षेत्र असलेले ‘वढा’ तीर्थक्षेत्राचा विकास करण्याला आपले प्राधान्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज व पर्यावरणपूरक नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला मंजूरी देण्यात आली असून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आता वनपर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचासुध्दा लाभ येथे मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत 2023 पर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी हे संकट पूर्णपणे टळले नाही. पहिल्या लाटेच्या अनुभवातून शिकून दुस-या लाटेत अनेक उपाययोजना प्रशासनाने केल्या. यात कोव्हीड केअर सेंटरची संख्या वाढविणे, नागरिकांच्या सुविधेसाठी पोर्टलची व्यवस्था, ऑक्सीजन पुरवठा, बेडची संख्या आदींचा समावेश आहे. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना खनीज विकास निधीमधून पाच लक्ष रुपयापर्यंतचे इंजेक्शन आणि औषधांचा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संभाव्य तिस-या लाटेबाबतही नियोजन करण्यात आले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 313 गावे कोरोनामुक्त ठेवण्यात यश प्रशासनाला यश आले आहे.

कोरोनात पालक गमाविलेल्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने ‘मिशन संगोपन’ उपक्रम हाती घेतला आहे. विधवा झालेल्या 46 महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. तसेच दोन पालक गमाविलेल्या 3 बालकांना जिल्हा टास्क फोर्सच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य योजनेनुसार 5 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात 7 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील इतरही पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यासाठी नियमितपणे मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते वीर शहीद योगेश वसंत डाहुले यांच्या विर माता-विर पिता यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. जागतिक गालीचा रंगोली जाकोबिओ 2021-22 या स्पर्धेत सहभागी कलावंतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यासोबतच  सन 2021 मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत अपघातग्रस्त व्यक्तींना तसेच त्यांच्या वारसांना मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील सोनेगाव येथील रहिवासी स्वप्निल गोवर्धन गोहने यांना चार लक्ष रुपयाचे धनादेश वितरीत करण्यात आला तर उसगाव येथील सुधाकर मोतीराम मंगाम हे वीज पडून जखमी झाल्यामुळे त्यांना शासनाच्या नियमानुसार 12 हजार 700 रु.चा धनादेश देण्यात आला.

जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरमार्फत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्ययोजनेअंतर्गत उल्लेखनिय कामगिरीबाबत मुसळे हॉस्पिटल व वासाडे  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर कडून मौजा अडेगाव, अागरझरी,पहामी तसेच बाई गाव येथील अनुसूचित जमातीतील पात्र दावेदार यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम 2006 अन्वये वैयक्तिक वनहक्काचे अभिलेख मंजूर करण्यात आले तसेच सदर अभिलेखांचे संबंधित दावेदारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.