मनपा क्षेत्रात ३६,९५३ बालकांना डोज पाजण्याचे उद्दिष्ट निर्धारीत

मनपा क्षेत्रात ३६,९५३ बालकांना डोज पाजण्याचे उद्दिष्ट निर्धारीत
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

चंद्रपूर २७ फेब्रुवारी – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात येत्या ३ मार्च रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत मनपा क्षेत्रातील ३६,९५३ बालकांना डोज पाजण्याचे उद्दिष्ट निर्धारीत करण्यात आले आहे.
या मोहीमेच्या नियोजनासाठी मनपा स्तरीय सिटी टास्क फोर्स समितीची बैठक आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली २२ फेब्रुवारी रोजी मनपा स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. नियोजनानुसार शहरात १४४ पोलिओ तात्पुरती लसीकरण ( बुथ) उभारले जाणार आहेत.या सर्व बुथवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. याशिवाय गृहभेटीकरीता  १८९ तात्पुरत्या टीम, प्रवासात असलेल्या बालकांना,स्थलांतरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी याकरिता १९ मोबाइल टीम्स तर बसस्थानक,रेल्वे स्टेशन,यात्रास्थळे या ठिकाणी ३२ ट्रांझीट टीम असणार आहेत. आरोग्य विभाग व इतर विभागाचे कर्मचारी मिळुन एकुण ४९५ कर्मचारी या मोहीमेत कार्यरत असणार आहेत.
बैठकीत डॉ. मोहम्मद साजीद, सर्व्हलन्स मेडीकल ऑफिसर, नागपूर यांनी चंद्रपूर मनपासंबंधी पल्स पोलिओ अभियानाचे तयार केलेले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे सादरीकरण त्यांचे वतीने डॉ. सौ. वनिता गर्गेलवार यांनी केले. मागील मोहिमेत झालेले चांगले काम तसेच आढळलेल्या त्रुटींची दुरुस्ती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच ०-५ वर्ष वयोगटातील १०० टक्के बालकांना मोहिमेत पोलिओ लस पाजण्याकरीता मनपाच्या आरोग्य विभागातर्फे केलेल्या व्यवस्थेबाबत तसेच इतर विभाग आणि स्वयंसेवी संस्थांकडुन अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी मनपा प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ. सौ. वनिता गर्गलवार, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. आरवा लाहेरी, डॉ. अतुल चटकी, डॉ. विजया खेरा, डॉ. नयना उत्तरवार, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधु, तसेच शहरातील सामाजिक स्वयंसेवी संस्था रोटरी क्लब तर्फे श्री. मिलिंद बोडखे, इंडियन मेडीकल असोसिएशन तर्फे डॉ. सोनाली कपुर, जे. सी.आय. तर्फे श्री. राजेंन्द्र रघाटाटे व अॅड. राम मेंढे, आय.ए.पी, तर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. समृध्दी वासनिक, लॉयन्स क्लब, महाकाली चंद्रपुर तर्फे डॉ. मृनालिनी धोपटे, इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे डॉ. पी. व्ही. मेश्राम व श्री एस. मरसकर, डब्लु.सी.एल. ऐरिआ हॉस्पीटल तर्फे डॉ. जोत्स्ना पडवाईक, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.