बचत गट व सर्वसाधारण महिलांकरीता विविध शासकीय योजनांची कार्यशाळा

उद्योजक बनतांना कल्पकतेने व्यवसाय निवडा – मा. पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार  
बचत गट व सर्वसाधारण महिलांकरीता विविध शासकीय योजनांची कार्यशाळा

चंद्रपूर २७ फेब्रुवारी – आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यास उद्योजक बनतांना व्यवसायाची कल्पकतेने निवड करणे आवश्यक आहे. जर सर्व बचतगटातील महिलांनी ठराविक प्रकारचेच व्यवसाय केले तर त्यात मागणी कमी व पुरवठा ज्यास्त होऊन तो उदयॊगाला मारक ठरेल त्यामुळे व्यवसाय हा कल्पकतेने निवडण्याचे प्रतिपादन मा.पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बचत गटातील व सर्वसाधारण महिलांकरीता विविध शासकीय योजनांची कार्यशाळा २४ फेब्रुवारी रोजी नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. सदर कार्यशाळेचे उदघाटन मा.पालकमंत्री श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. मा. पालकमंत्री यांनी सांगितले की, महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी महीला बचतगटांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे,आज या कार्यशाळेतील मार्गदर्शिका सोनिया जाडा यांनी ज्याप्रमाणे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे मार्गदर्शन सत्र सातत्याने आयोजीत करावे. त्यामाध्यमातुन महिलांना उद्योग,स्वयंरोजगारासंबंधी नवी दिशा कळेल. त्याचप्रमाणे महिलांसाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ महिलांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यशाळेत मनपा अंतर्गत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना,राष्ट्रीय बँक अंतर्गत योजना,प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना,समाज कल्याण विभाग,महिला व बाल कल्याण विभाग,संजय गांधी निराधार योजना,महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा कौशल्य विकास केंद्र,नाबार्ड इत्यादी विभागातील शासनाच्या विविध योजनांचे प्रेझेंटेशन यावेळी उपस्थीत महिलांसाठी करण्यात आले. त्याचप्रमाणे बचत गटांना व वैयक्तिक लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र व दोन दिव्यांग लाभार्थ्यांना ई-रिक्षा करीता कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले. सानिया जाडाजी यांनी महिलांनी कुठला व्यवसाय योग्य राहील व व्यवसायात प्रगती कशी साधावी यासंबंधी प्रेरणादायी व्याख्यान दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगडे,जिल्हा कौशल्य विकास सहा.आयुक्त भैय्याजी येरमे,तृणाल फुलझेले,मधुकर भुरले,प्रदीप काथोडे,अजय साखरकर इत्यादी उपस्थीत होते.
कार्यक्रमासाठी दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजना प्रमुख रफिक शेख, रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम,शहर अभियान व्यवस्थापक तसेच समुदाय संघटक पांडुरंग खडसे,सुषमा करमनकर,रेखा लोणारे, रेखा पाटील, चिंगुताई मुन तसेच वॉर्ड सखी यांनी परीश्रम घेतले