वन्यजीवांसोबतच मानवी जीवसुध्दा महत्वाचा  – पालकमंत्री वडेट्टीवार Ø वन्यप्राण्यांकडून वाढत्या हल्ल्यांबाबत व्यक्त केली चिंता Ø वनविभागाने गस्त वाढविण्याचे निर्देश

वन्यजीवांसोबतच मानवी जीवसुध्दा महत्वाचा  – पालकमंत्री वडेट्टीवार

Ø वन्यप्राण्यांकडून वाढत्या हल्ल्यांबाबत व्यक्त केली चिंता

Ø वनविभागाने गस्त वाढविण्याचे निर्देश

चंद्रपूर, दि. 23 एप्रिल : सिंदेवाही आणि परिसरात गत तीन दिवसात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. जंगलालगत असलेल्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहे, याबाबत चिंता व्यक्त करत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जंगलव्याप्त भागात वनविभागाने गस्त वाढवावी, असे निर्देश दिले. तसेच वन्यजीवांसोबत मानवी जीवसुध्दा महत्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव जाणार नाही, याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशा सुचना त्यांनी वनविभागाला दिल्या.

मानव – वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभुमीवर सिंदेवाही येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, गत तीन – चार दिवसांपासून लगातार वन्यप्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होत आहे. नित्याच्याच झालेल्या या घटना रोखणे खुप आवश्यक आहे. अशा घटना घडल्या की नागरिकांचा आक्रोश वाढतो. त्यामुळे काही अघटीत होऊ नये, यासाठी वनविभागाने त्वरीत उपाययोजना करावी. जंगलव्याप्त गावांत जास्तीची माणसे देऊन वनविभागाने गस्त वाढवावी. प्रत्येक गावात किमान 10 लोक या गस्तकरीता असली पाहिजेत. वाघ आणि बिबट असलेल्या गावांत सोलर लाईट त्वरीत लावावे. त्यासाठी वनअधिका-यांनी आपापल्या क्षेत्रातील प्रस्ताव तातडीने पाठवा.

जंगलालगत असलेल्या गावात रात्रीचे भारनियमन होत असल्यामुळे अंधाराचा फायदा घेत वन्यजीवांचे हल्ले वाढल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा गावात कोणत्याही परिस्थतीत रात्रीचे भारनियमन होता कामा नये. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

सिंदेवाही आणि परिसरात लगातार वन्यप्राण्यांकडून झालेल्या हल्ल्याची माहिती मुंबईत होताच पालकमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित यंत्रणेला तात्काळ सूचना दिल्या. तसेच नरभक्षक असलेल्या या वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा, असे निर्देशही त्यांनी मुंबई येथून दिले होते. अतिशय संवेदनशील आणि नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या या विषयाबाबत त्यांनी त्वरीत सिंदेवाहीत दाखल होऊन वनविभागाची बैठक घेतली.  यावेळी ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा व  वन विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.