17 ते 20 फेब्रुवारी महासंस्कृती व बल्लारपूर महोत्सव Ø नामवंत तसेच स्थानिक कलाकारांचे सादरीकरण

17 ते 20 फेब्रुवारी महासंस्कृती व बल्लारपूर महोत्सव Ø नामवंत तसेच स्थानिक कलाकारांचे सादरीकरण

चंद्रपूर, दि. 16 : सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 17 ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान जुना तालुका क्रीडा संकूल, गौरक्षण वॉर्ड, बल्लारपूर येथे “महासंस्कृती व बल्लापूर महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हा तसेच राज्यातील संस्कृतीचे सादरीकरण होणार असून नामवंत कलाकारांसोबतच स्थानिक कलाकारांचेसुध्दा सादरीकरण होणार आहे.

 सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन 17 फेब्रुवारीला सायंकाळी 5.30 वाजता वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या महोत्सवात 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत प्रसिध्द पार्श्वगायक सुखविंदरसिंह यांची स्वरसंध्या, 18 फेब्रुवारी रोजी स्थानिक कलाकारांचे वाघ नृत्य, शिव महिमा नृत्य आणि गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम, 19 फेब्रुवारी रोजी ‘आझादी -75’ यावर आधारीत नाट्य आणि 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत संस्कार भारती हा कार्यक्रम आयेाजित करण्यात आला आहे.

 प्रशासनाच्या वतीने आयोजित महासंस्कृती व बल्लारपूर महोत्सव सर्वांसाठी खुला व निःशुल्क असणार आहे. या महोत्सवात स्थानिक कलावंतांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यात येणार आहे. जिल्हावासीयांनी या महोत्सवास उपस्थित राहून सर्व कलावंतांचा उत्साह वाढवावा व आपल्या संस्कृतीला अनुभवण्याचा आंनद घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. तसेच जिल्हा महासंस्कृती महोत्सव आयोजन समितीने केले आहे.