महाकाली यात्रेच्या पार्श्वभुमीवर अपर जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

महाकाली यात्रेच्या पार्श्वभुमीवर अपर जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 

चंद्रपूर, दि. 13 : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली महाकाली माता यात्रा 27 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. या पार्श्वभुतीवर अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व संबंधित यंत्रणा व महाकाली देवस्थान विश्वस्त मंडळाची आढावा बैठक घेतली.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, उपविभागीय पोलिस अधिकारी एस.पी.नंदनवार, पोलिस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, अन्न व औषध विभागाचे नितीन मोहिते, वेकोलीचे व्यवस्थापक आर. के. सिंग, महाकाली देवस्थानचे विश्वस्त सुनील महाकाले आदी उपस्थित होते.

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, मोठ्या संख्येने येणा-या भाविकांसाठी स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौच्छालय आदींची व्यवस्था चोख असावी. स्वयंसेवक व संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने योग्य व सुक्ष्म नियोजन होणे आवश्यक आहे. जेणेकरून सदर यात्रा महोत्सव भक्तीभावाने आणि शांततेत पार पडेल. मंदीर परिसरात विश्वस्त मंडळाचे स्वयंसेवक सतत फिरत असले पाहिजे. नागरिकांसाठी सुचनांचे फलक ठळक अक्षरात व दर्शनी भागात लावावे. राज्य परिवहन मंडळाने बसेसचे वेळापत्रकाचे फ्लेक्स लावणे आवश्यक आहे. वाहतुक व्यवस्था खोळंबणार नाही, याची वाहतूक शाखेने दक्षता घ्यावी.

 

परिसराची व नदीकाठावरील घाटाची चंद्रपूर महानगर पालिकेने संपूर्ण स्वच्छता करावी. त्यानंतरच वेकालीने पाणी सोडावे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्व संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. मंदीर परिसर, भाविकांच्या गर्दीत व इतर ठिकाणी मोकाट जनावरे जाणार नाही, याचा चोख बंदोबस्त करावा. पोलिस विभागाने तक्रार निवारण केंद्र उभारावे व नागरिकांसाठी सुचनांची माहिती लाऊडस्पीकरच्या माध्यमातून नियमितपणे द्यावी, अशा सुचना अपर जिल्हाधिकारी श्री. देशपांडे यांनी दिल्या.