जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना होता येणार वैमानिक Ø चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन अंतर्गत प्रशिक्षण देण्याचे नियोजन

जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींना होता येणार वैमानिक

Ø चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन अंतर्गत प्रशिक्षण देण्याचे नियोजन

चंद्रपूर, दि. 15 : नक्षलग्रस्त, दुर्गम व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी चंद्रपूर फ्लाईंग स्टेशन अंतर्गत मोरवा विमानतळ, चंद्रपूर येथे जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षणाकरीता प्रति विद्यार्थी एकूण प्रशिक्षण खर्च रुपये अंदाजे 41 लक्ष येणार असून, लेखी परीक्षा व वैद्यकीय तपासणीअंती निवड करण्यात येणाऱ्या एकूण 10 विद्यार्थ्यांकडून एकूण प्रशिक्षण खर्चाची 10 टक्के रक्कम भरून घेऊन त्यांना 18 महिन्याचे वैमानिक प्रशिक्षण देण्याचे प्रयोजन आहे.

लाभार्थी उमेदवाराकरीता निकष:

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता 10+2 भौतिकशास्त्र व गणित विषय घेऊन, ग्रामीण भागासाठी किमान 65 टक्के गुण व शहरी भागासाठी किमान 70 टक्के गुण प्राप्त करून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा किंवा झालेली असावी. उमेदवार डीजीसीए मान्यताप्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या तपासणीमध्ये शारीरिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.

सदर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर लेखी परीक्षेद्वारे पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल व अंतिमरित्या पात्र विद्यार्थ्यांची वैमानिक प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (अति.) दगडू कुंभार यांनी कळविले आहे.