बरांज (मो.) येथील उपोषणकर्त्यांसोबत प्रशासनाची बैठक Ø उपोषण सोडण्याचे आवाहन

बरांज (मो.) येथील उपोषणकर्त्यांसोबत प्रशासनाची बैठक Ø उपोषण सोडण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 13 : मौजा बरांज (मो.) येथील ओपन कास्ट माईन्समध्ये उपोषण करीत असलेल्या उपोषणकर्त्यांसोबत स्थानिक प्रशासनाने बैठक घेऊन वाढीव मागण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावे, असेही आवाहन तालुका प्रशासनाने केले.

बरांज येथील स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण न झाल्यामुळे पल्लवी आण्याजी कोरडे व काही नागरिक हे 27 डिसेंबर 2023 पासून इंटीग्रेटेंड बरांज ओपण कास्ट  माईन्स (KPCL) येथे आमरण उपोषण करीत आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून उपोषणकर्त्यांसोबत वारंवार चर्चासुध्दा करण्यात आली. आज (दि.13) वरोराच्या उपविभागीय अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांच्या अध्यक्षतेखाली उपोषणकर्त्याचे मागणीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीस जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल जटाळे, भद्रावतीचे नायब तहसिलदार तसेच के.पी.सी.एल. कंपनीचे प्रतिनिधीं श्री. जिभकाटे, श्री. आलम शेख उपस्थित होते.

यावेळभ्‍ उपोषणकर्ते पल्लवी कोरडे व इतर प्रतिनिधींनी खालील मागण्यांचे निवेदन सादर केले. सन 2014-2020 पर्यंत केपीसीएल कंपनी बंद असतांना 15 सप्टेंबर 2016 मध्ये करण्यात आलेले करार (Agreement) रद्द करण्यात यावे. मौजा बरांज मोकासा गावाचे पुनर्वसनाकरीता मौजा कुडराळा ता. भद्रावती या गावाची जागा निश्चित करण्यात आली होती. तरी सदर गावाचे पुनर्वसन त्या ठिकाणी न करता चंद्रपूर-  नागपूर या हायवे लगत करावे. करारमध्ये प्लॅाट ऐवजी एकमुस्त रक्कम 5 लाख ऐवजी 15 लाख वाढ  करण्यात यावी. प्रकल्प बाधीत व्यक्तींना नौकरी ऐवजी एकमुस्त अनुदान 15 लाख देण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नौकरी देण्यात यावी. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या 27 जुलै 2014 रोजीच्या बैठकीनुसार बरांज मो. येथील 1269 घरांचे भुसंपादन करण्यात यावे. प्रकल्पग्रस्त आदिवासींना 5 एकर शेती व घर बांधकाम करून देण्यात यावे. अवार्डनुसार 446 घरांचे मोबदला आर. ॲन्ड आर. नुसार जमा करण्यात यावा. पुनर्वसन पॉलीसीनुसार 750 दिवसांची मजूरी 1500 दिवसांची देण्यात यावी.

           या मागण्या नियमानुसार असल्यास त्या संदर्भांत नियमाप्रमाणे निर्णय घेण्यात येईल व वाढीव मागण्यासंदर्भांत सकारात्मक प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल, असे सांगून उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याबाबत आवाहन करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी, वरोरा यांनी कळविले आहे.