चमत्कार करून दाखवा आणि तिस लाख रुपये मिळवा – अनिल लोनबले

चमत्कार करून दाखवा आणि तिस लाख रुपये मिळवा – अनिल लोनबले
या जगात कोणीही चमत्कार करू शकत नाही.कुणालाही दैवी शक्ती प्राप्त होत नाही. जे चमत्कार केल्याचा दावा करतात, ते ढोंगी असतात. चमत्कार करून दाखवा आणि ३०लाख रुपये मिळवा! असे आव्हान अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले यांनी केले. ते श्री. गुरुदेव सेवा मंडळ, पेंढरी (मक्ता), ता. सावलीच्या वतीने आयोजित,’वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायदा’ या विषयावरील प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सहप्रयोग समाजातील अंधश्रद्धांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सिंदेवाही तालुका संघटक डेकेश्वर पर्वते यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समितीची भूमिका विशद केली. ते बोलताना म्हणाले की, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कोणत्याही देवा-धर्माला विरोध नाही; मात्र जे बुवा-बाबा, तांत्रिक -मांत्रिक देवा-धर्माचा आधार घेऊन समाजाचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करतात त्यांना आमचा विरोध आहे. समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे असेही ते म्हणाले.
मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सिंदेवाही तालुका युवा संघटक किशोर कावळे यांनी जादूटोणा विरोधी कायद्याची विस्तृत माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गुरुदेव सेवा मंडळ, पेंढरी (मक्ता) चे अध्यक्ष सुरेश ढोले यांनी केले, तर सूत्रसंचालन तथा आभारप्रदर्शन निंबाजी निकोडे यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.