चंद्रपूर : देश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

देश विदेशातील पर्यटकांना वन पर्यटनासोबतच

रेशीम पर्यटनाचा घेता येणार आस्वाद

– पालकमंत्री विजय वड़ेट्टीवा

चंद्रपूर दि. 2 ऑगस्ट : लोकांच्या हातांना रोजगार देणे हे आपले पहिले प्राधान्य असून आरोग्य आणि रोजगार यावर अधिक भर देण्यात येत आहे. तसेच येथे येणार्‍या देश विदेशातील पर्यटकाला वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटनाचासुद्धा आनंद घेता येईल, असा विश्वास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

रेशीम संचालनालयामार्फत आयोजित टसर रेशीम पर्यटन विकास केंद्र आगरझरी येथे आयोजित भुमीपुजन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) जी. गुरुप्रसाद, क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, सहाय्यक संचालक श्री. ढवळे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात नव्याने उभा राहत असलेल्या रेशीम प्रकल्पाच्या व्हीजनला व कार्याला कोठेही अडथळा येणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकल्पाला भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देत सुंदर असा प्रकल्प याठिकाणी साकारेल. तसेच टसर रेशीम प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरातील स्थानिक नागरिकांना मोठा रोजगार प्राप्त होईल.

पालकमंत्री पुढे म्हणाले, एखाद्या अधिकाऱ्यांमध्ये काही करायची धडपड असेल तर त्या कार्याला मूर्तरूप ते देऊ शकतात. आरमोरी आणि पाथरी या ठिकाणी रेशीमचे उत्पादन व्हायचे व या ठिकाणी विक्री केंद्रे सुद्धा होती. रेशीमच्या कापडाला बाजारात आजही मोठी मागणी असून रेशीमच्या कापडाची वेगळीच ख्याती आहे. त्यावेळी मच्छीमार बांधवांना मच्छिमारी बरोबरच दुसरा व्यवसाय म्हणजेच रेशीम व्यवसाय होता. आज पैठणी साडी तसेच लेनीन कापड यामध्येसुद्धा रेशीमचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यामुळे देश-विदेशातून येणारे पर्यटक या प्रकल्पाला भेट देतील. येथे येणाऱ्या पर्यटकांना वन पर्यटनासोबतच रेशीम पर्यटन अनुभवास मिळेल.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले की,  अतिशय चांगला व गावातील नागरिकांना रोजगार देणारा हा प्रकल्प ज्या ठिकाणी उभा राहत आहे. त्यामुळे निश्चितच या गावातील स्थानिक नागरिकांना या माध्यमातून रोजगार तर मिळेलच पण त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही मदत मिळेल. ताडोबा मध्ये देश-विदेशातील पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. ताडोबा सोबतच टसर सिल्क या प्रकल्पाच्या माध्यमातून टसर पर्यटन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत म्हणाल्या की, पूर्व विदर्भातील कर्वती साडीला जीआय टॅगिंग मिळाली आहे. प्रकल्प कोणत्याही कानाकोप-यात उभा केला तर तो लोकांच्या दृष्टीला पडणार नाही. यासाठी ज्या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक येतात त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्याचा विचार होता. वनविभागाच्या मदतीने एक एकराची जमीन या प्रकल्पास उपलब्ध झाली आहे. येथील प्रशासनामुळे व त्यांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास येईल. हा प्रकल्प म्हणजे पर्यटन आणि रेशीम यांच्या समन्वयातून निर्माण होणारा प्रकल्प आहे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यटकांना रेशीम प्रक्रिया कशी चालते? आणि त्याच्यातून माल कसा उत्पादित केला जातो? हे लाईव्ह बघता येणार आहे. तसंच उत्पादकांना छोटे स्टॉल याठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे व त्या ठिकाणी सदर उत्पादने विक्रीला असतील. गावातील स्थानिक नागरिकांना व बचत गटांना सदर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी टसर प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली.