गझल नवाज भीमराव पांचाळे, संदीप खरे, सलील कुलकर्णी या कलावंतांचे महा संस्कृतीत सादरीकरण

गझल नवाज भीमराव पांचाळे, संदीप खरे, सलील कुलकर्णी या कलावंतांचे महा संस्कृतीत सादरीकरण

26 ते 30जानेवारी महा संस्कृती महोत्सव

             भंडारा, दि.24 :स्थानिक लोक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने  जिल्ह्यात महा संस्कृती महोत्सवाचे आयोजन 26 ते 30 जानेवारी दरम्यान रेल्वे मैदानात करण्यात आले आहे. या महासंस्कृती महोत्सवादरम्यान स्थानिक लोककलावंत झाडीबोली व झाडीपट्टीच्या विविध कलाप्रकाराचेसादरीकरण करतील.त्यामधे रोवणीची गाणी, लग्नाची गाणी, गोंधळ, भारुड संगीत संध्या यांच्यासोबत गझल नवाज भीमराव पांचाळे यांची गझल मैफिल आणि आयुष्यावर बोलू काही हा संदीप खरे व सलील कुलकर्णी यांच्या काव्यमय कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे.

         शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे व जिल्हा प्रशासना तर्फे महासंस्कृती महोत्सवाचे पाच दिवस आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यानच महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम 26 जानेवारी सायंकाळी सहा ते दहा या दरम्यान होणार आहे.

         27 व 28 जानेवारी रोजी स्थानिक कलावंतांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण होईल. सारेगमप फेम गायक यांचा समावेश असलेली संगीत संध्या देखील 27 तारखेला होणार आहे. 28 तारखेला खडीगंमत, दंडार, मंगळागौर नृत्य तसेच सूर संस्कृती हा कार्यक्रम होणार आहे.

        ग्रंथोत्सवा दरम्यान 29 व 30 जानेवारी रोजी ग्रंथ दिंडी, शिव व्याख्यान आणि रयतेचा राजा हे  नाटक सादर करण्यात येईल. त्यानंतर 30 जानेवारी रोजी आयुष्यावर बोलू काही हा संगीत काव्य मैफिलीचा कार्यक्रम संदीप खरे व सलील कुलकर्णी व त्यांचा संच सादर करतील.

        महा संस्कृती हा उत्सव त्या जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देणे आणि सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची जिल्हावासीयांना मेजवानी असणार आहे .या कार्यक्रमाकरिता प्रवेश निशुल्क आहे .तरी सर्व भंडारावासियांनी या पाच दिवसीय महा संस्कृती कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.