राज्यातील नगरपरिषदांतील 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी / बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही – वडेट्टीवार

राज्यातील नगरपरिषदांतील 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे पत्र लिहून मागणी

सरकारने बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये

बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही –  वडेट्टीवार

मुंबई, दि. 14: राज्यातील नगरपरिषदातील संपूर्ण रिक्त पदे भरली पाहिजेत. परंतु सरकार एकूण रिक्त पदांच्या 40 टक्के पदांची भरती करत आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगार परीक्षार्थी उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. असे असताना फक्त 40 टक्के पद भरती करून सरकार बेरोजगार परीक्षार्थींवर अन्याय करत आहे. सरकारने बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. नगरपरिषदातील संपूर्ण 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात 32 लाख उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या सर्व तरूणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. संपूर्ण रिक्त पदे भरण्याची सरकारची मानसिकता नाही. सरकारच्या या धोरणामुळे बेरोजगारांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारला बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यात रस नाही. या बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा महायुतीचे सरकार घेत आहे.

परीक्षा घेणाऱ्या खासगी आयटी कंपन्यांचे हित जोपासण्याच्या नादात सरकार दंग आहे. सरकारला बेरोजगारांचा भवितव्याची काळजी नाही. पदभरती प्रक्रियेत, परीक्षा पद्धतीत सुसूत्रता आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या पदभरती प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता आणावी. रिक्त पदांची भरती करताना 100 टक्के रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करत बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही, असा इशारा देखील श्री. वडेट्टीवार यांनी दिला आहे.