चंद्रपूर मनपाद्वारे स्वच्छ शौचालय मोहीमेस प्रारंभ

चंद्रपूर मनपाद्वारे स्वच्छ शौचालय मोहीमेस प्रारंभ

४ डिसेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे स्वच्छ शौचालय मोहीमेस सुरवात करण्यात आली असुन याअंतर्गत महिला बचतगटांद्वारे संजय गांधी कॉम्प्लेक्स, बस स्थानक परिसर व बागला चौक परिसरातील मनपा शौचालयांमध्ये ३ डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिवसापासून अभियानाला प्रारंभ झाला असून २५ डिसेंबर या सुशासन दिनापर्यंत अभियानाच कालावधी असणार आहे. या पाच आठवड्यांच्या कालावधीत सर्व शौचालयांमध्ये स्वच्छता व देखभाल विशेष मोहीम राबवली जाणार असून शौचालयांमध्ये FACES अर्थात Functional, Accessibility, Clean, Eco-friendly आणि Safe अशाप्रकारे ‘कार्यान्वित, प्रवेशयोग्य, स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित’ अशा बाबींनुसार शौचालय तपासणी करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत महिला बचत गटांद्वारे शौचालयांची तपासणी करण्यात येणार असून त्याची वर्गवारी केली जाणार आहे. या माध्यमातून महिला बचत गटांचे सक्षमीकरणही केले जाणार आहे. यासाठी महिला बचत गटांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना रितसर प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला बचत गटांचे हे तपासणी समूह शौचालयांना भेटी देऊन त्यांची प्रत्यक्ष पाहणी करत दिलेल्या निकषानुसार त्यांचे मूल्यांकन करून शौचालयांना श्रेणी देतील.
याप्रमाणेच ‘स्वच्छ शौचालय चॅलेंज’ जाहीर करण्यात आले असून ५ डिसेंबर ते १५ डिसेंबर हा या अभियानाचा कालावधी आहे. या अंतर्गत स्वच्छ शौचालयांना ‘स्वच्छ भारत सार्वजनिक शौचालय’ असा गुणवत्तेचा दर्जात्मक शिक्का प्राप्त होणार आहे. चंद्रपूर शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची शौचालये उपलब्ध करून देण्याचा चंद्रपूर महानगरपालिकेला प्रयत्न असुन मनपाची सर्व शौचालये गुगल मॅप वर सहजपणे उपलब्ध आहेत व नागरिकांच्या वापरासाठी त्यांचा गुणात्मक दर्जा कायम राहील याच्याकडेही लक्ष दिले जात आहे.