प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये सदर योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम 202३ करिता दिनांक 31 जुलै, 2023 अशी आहे. त्यासाठी PMFBY  ऑनलाईन  पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे .

खरीप हंगाम मध्ये भात,ज्वारी,बाजरी,नाचणी,मुग,उडीद,तूर,मका,भुईमुग, कारळे, तीळ, सोयाबीन,कापूस व खरीप कांदा (१4 पिके) या अधिसूचित पिकांसाठी , अधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पिक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ 1/- रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित बँक, PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in/ व आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत विमा अर्ज करता येईल. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा. कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणा-या बॅकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.

योजनेतील सहभाग संदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास आपल्या तालुका संबंधित पिक विमा कंपनीचे कार्यालय, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचेशी संपर्क साधावा.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा :

जिल्हा समुह क्रमांक जिल्हे अंमलबजावणी करणारी विमा कंपनी

1 अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर ओरिएन्टल इंन्शुरन्स कं. लि.

2 सोलापूर, जळगाव, सातारा ओरिएन्टल इंन्शुरन्स कं. लि.

3 परभणी, वर्धा, नागपूर आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं.लि.

4 जालना, गोंदिया, कोल्हापूर युनिव्हर्सल सोम्पो जनरल इं. कं. लि.

5 नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कं. लि.

6 औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड चोलामंडलम एम. एस. जनरल इं. कं. लि.

7 वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार भारतीय कृषि विमा कंपनी

8 हिंगोली, अकोला, धुळे, पुणे एचडीएफसी जनरल इं. कं. लि.

9 यवतमाळ, अमरावती, गडचिरोली रिलायंन्स जनरल इंन्शुरन्स

10 उस्मानाबाद एचडीएफसी जनरल इं. कं. लि.

11 लातुर एस. बी. आय. जनरल इं. कं. लि.

12 बीड भारतीय कृषि विमा कंपनी

तरी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन पिकाचा विमा घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे .