“भारत न्याय यात्रा” काँग्रेसला बळकटी आणि नवसंजीवनी देणारी ठरेल – विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास

“भारत न्याय यात्रा” काँग्रेसला बळकटी आणि नवसंजीवनी देणारी ठरेल – विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास

गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचां विभागीय मेळावा

जुन्या कामाचे नव्याने भूमिपूजन करून स्वतःची पाठ थोपटण्याचे काम मोदी सरकार करत आहे – वडेट्टीवार यांचे टीकास्त्र

मुंबई/नागपूर,14 :- राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून सुरू झालेल्या “भारत न्याय यात्रा” मुळे काँग्रेसला पुन्हा बळकटी आणि नवसंजीवनी मिळेल,असा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, सद्या देशात न्याय उरला नाही. संविधान संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. तानाशाही प्रवृत्तीने या देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. म्हणून, देशामध्ये न्याय पाहिजे असेल तर लोकांनी काँग्रेसबरोबर आले पाहिजे. मणिपूरमध्ये दिवसाढवळ्या आदिवासी महिलेवर बलात्कार केला जातो, तिची धिंड काढली जाते. तरीही राज्यातील व देशातील प्रमुख त्यावर बोलत नाहीत. त्याठिकाणी जात नाहीत.याचा अर्थ त्यांना जनतेला न्याय द्यायचा नाही. असे असताना आमचे नेते राहुलजी जात असतील तर त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला जातो. बिल्कीस बानोवर बलात्कार करतात, खून करतात तरी आरोपींना मोकाट सोडले जाते.आदिवासी दलितांचे शोषण केले जाते. तीन वर्षापासून केंद्र सरकार शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईबला स्कॉलरशिप देत नाही. असे असताना न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल करत वडेट्टीवार म्हणाले, भाजपा राम मंदिराचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करून रामाच्या नावानं मत लाटण्याच पाप करत आहे. खुद्द शंकराचार्य यांनी विरोध केला त्यास न जुमानता रामाचा, धर्माचा वापर राजकारणासाठी करायचा अशाप्रकारची प्रवृत्ती देशात आहे म्हणून महिलांच्या सुरक्षेसाठी, ओबीसी, दलीत, शोषिताना न्याय देण्यासाठी, देशात बिघडलेली कायदा सुव्यवस्था पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी, देशातील लोकशाही वाचवीण्यासाठी राहुल गांधीजीनी काढलेल्या न्याय यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि तिथून देशात परिवर्तनाची नांदी ठरेल. आणि पुन्हा देशात सर्व धर्म समभावाचे वातावरण निर्माण होण्यासाठी राहुल गांधी यांचे श्रम उपयोगी ठरतील असा विश्वास वडेट्टीवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुका आणि त्या संदर्भातला कार्यक्रम कधीही घोषित होऊ शकतो. साधारणतः मागील वेळेस मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता घोषित केली होती. परंतु, या वेळेस मात्र वीस तारखेपर्यंत आचारसहिता असा अंदाज वर्तवला जात आहे.केंद्र सरकारनं एकतीस तारखेपासून विशेष अधिवेशन बोलावलं आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून आमची तयारी सुरू आहे. दिल्लीत आणि महाराष्ट्रात बैठका सुरू झाल्या आहेत. काल परवाच प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपसथितीमध्ये बैठक झाली.बैठकीमध्ये विभागीय बैठका घेण्याचं नियोजन ठरल. विभागीय बैठका या मुख्यतः विभागीय स्तरावर होतात. मात्र, यावेळी मी आग्रह केला नागपूरमध्ये स्थापना दिवसा निमित्ताने ऐतिहािक कार्यक्रम पार पडला आहे. त्यामुळे बैठक नागपुरऐवजी नेहमी दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बैठक घ्यावी. त्यानुसार येत्या वीस तारखेला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्री, प्रमुख नेते यांच्या उपस्थित दोन सत्रात वीस तारखेला विभागीय शिबिर आणि मेळावा पार पडणार आहे. सुरुवात अठरा तारखेपासून अमरावती पासून होईल आणि वीस तारखेला विभागाचा मेळावा गडचिरोलीमध्ये होणार आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये पहिल्यांदाच विभागीय काँग्रसचे शिबिर होत आहे. एकूणच काँग्रेसमय वातावरण या जिल्ह्यात या निमित्ताने निर्माण करायचं ठरवलं आहे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.विद्यमान इथले लोकप्रतिनिधी हे निष्क्रिय झाले आहेत. हे सिद्ध झालेलं आहे. खासदारांनी गेल्या दहा वर्षांमध्ये दखल घेण्यासारखे एकही काम केले नाही आणि त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात विशेष बदल झाल्याचे दिसत नाही. दोन सत्रात होणाऱ्या सभेसाठी तालुका सेलचे अध्यक्ष,प्रमुख आणि बूथ ऑर्गनायझर यांची एक फळी त्यांना मार्गदर्शन करतील. दुपारनंतर जिल्हास्तरावरील प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात नक्कीच लोकसभेसाठी त्याचा फायदा काँग्रेसला होईल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, विकासाच्या नावाने आम्ही केलेल्या जुन्या कामाचे नव्यने भूमिपूजन करून स्वतः ची पाठ थोपटण्याचे काम मोदी सरकार करत आहे. न्हावा-शेवा शिवडी पुल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तयार झाला. मंजुरी मिळाली काम सुरू झाल. मोठ काम होत आता ते पूर्ण झाले. याचा अर्थ मोदी सरकार किंवा शिंदेनी काम केले असा अजिबात नाही. मोनो रेल, मेट्रो , या सर्व कामांना काँग्रेसच्या काळात काही प्रमाणात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तर काही कामांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूरी दिली. ही आमच्या काळात मंजूर झालेली कामे आहेत. या सरकारचं व्हिजन विकासाच नाही. चार रस्ते बांधली त्याच्यावर टोल लावून वसुली सुरू केली. टोलमुक्त भारत आणि महाराष्ट्राच्या गप्पा करणाऱ्यांनी लोकांचे खिसे कापण्याच काम या निमित्ताने सुरू केले आहे .असा टोलाही वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला.