त्या’ आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व अधिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

त्या’ आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व अधिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

गडचिरोली, दि.22 : शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळा, सोडे ता. धानोरा येथील विद्यार्थ्यांची जेवणानंतर अचानक तब्बेत बिघडल्याप्रकरणी, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व अधिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी दुपारच्या जेवणानंतर विद्यार्थिनींना मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी व उलटीचा त्रास सुरू झाल्याने तेथील 106 मुलींना ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे उपचाराकरिता भरती करण्यात आले. त्यापैकी 14 मुलींना प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून 40 मुलींना जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. तसेच 21 डिसेंबर 2023 रोजी 17 मुलींना सकाळी थोडी डोकेदुखी असल्याने त्यांनासुध्दा उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे भरती करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे 69 मुली व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे 40 मुली अशा एकूण इयत्ता 1 ली ते 4 थीच्या 7 मुली व इयत्ता 5 ते 12 वीच्या 102 अशा एकंदर 109 | मुली उपचाराकरीता भरती आहेत. यातील सर्व मुलींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून स्थिर आहे. या कामाकरिता ग्रामीण रुग्णालय, धानोरा, सामान्य रुग्णालय, गडचिरोली व प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी, येथील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी शर्तीचा प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्र, रांगी येथील आरोग्य पथक शासकीय आश्रमशाळा, सोडे येथे दि. 20डिसेंबर 2023 रोजी रात्रभर उपस्थित राहुन विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिले. तेथील विद्यार्थ्याच्या वापराकरिता असलेल्या अन्नधान्याचे नमूने अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करीता पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच पाणी नमुने व सदर दिवसाच्या दुपारच्या जेवणाचे शिजलेले अन्न आरोग्य विभागामार्फत उच्चस्तरीय तपासणी करिता पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सदर प्रकरणाबाबत शाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आलेला आहे.
सदर खुलासा प्राप्त होताच शहानिशा करून त्यांच्यावर पुढील योग्य ती कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. सदर घटनेची माहिती होताच सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, राहुल कुमार मीना व सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण यांनी सदर शाळेला तात्काळ भेट देऊन दवाखान्यात भरती असलेल्या व शाळेतील विद्यार्थीनींना त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली व शाळेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच आश्रमशाळेच्या कोटीगृहातील अन्नधान्याची आणि स्वयंपाकगृहाची पाहणी करण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे.