1252 अंगणवाडी केंद्रात पीएम- पोषण अभियान

1252 अंगणवाडी केंद्रात पीएम- पोषण अभियान

भंडारा,दि. 07 : महिला व बालविकास विभागामार्फत भंडारा जिल्हयामध्ये ग्रामीण प्रकल्पामध्ये एकूण 1252 अंगणवाडी केंद्र कार्यरत असून सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये पीए-पोषण अभियान राबविण्यात येते. पोषण अभियान अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये सामुदायिक विकास कार्यक्रमाचे (CBE) आयोजन करण्यात येते. सामुदायिक विकास कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना पोषण, आरोग्य व आहार इ. ची माहिती देण्यात येते. पोषण अभियान अंतर्गत पोषण ट्रॅकरचे माध्यमातून सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईलचा पुरवठा करण्यात आलेला असून पोषण ट्रॅकर ॲपचे माध्यामातून अंगणवाडी केंद्रातील लाभार्थींची नोंदी भरण्यात येतात व त्यामुळे महिला व बालविकास विभागामार्फत पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यास मदत होते. पोषण अभियान अंतर्गत् सप्टेंबर महिना हा पोषण माह व मार्च महिन्यामध्ये पोषण पंधरवाडयाचे आयोजन करण्यात येते. पोषण माह व पोषण पंधरवाडयामध्ये विविध विभागांचे समन्वयाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. पोषण अभियान अंतर्गत अंगणवाडी केंद्राचे सक्षमीकरण करुन अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सर्व सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येते.

            पोषण अभियानाचे प्रभावी अंमलबजावणीमुळे अंगणवाडी केंद्रामार्फत देण्यात येणा-या सेवा प्रभावीपणे राबविण्यास मदत झालेली आहे. कुपोषणाचे वस्तुनिष्ठ नोंदी घेण्यात आल्यामुळे बालकांचे कुपोषण कमी करण्यास व प्रत्यक्ष कुपोषित बालके, गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांना पोषण आहाराचे महत्व पटवून देण्यास मदत झाली असल्याचे महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुर्सुंगे यांनी कळवले आहे.