चंद्रपूर || जिल्हा कारागृह येथे कायदेविषयक शिबिर

चंद्रपूर || जिल्हा कारागृह येथे कायदेविषयक शिबिर

चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा कारागृह वर्ग -1 चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधीक्षक व तुरुंग अधिकारी रवींद्र जगताप, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी नेहा पंचारिया, माधुरी गोटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी सर्व न्यायालयीन बंदींना प्राधिकरणामार्फत मोफत विधी सहाय्य तसेच प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती मिळू शकते याबाबत मार्गदर्शन केले. सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नेहा पंचारिया यांनी न्यायालयीन बंदीचे अधिकार व जामीनाबाबत असलेल्या तरतुदी संदर्भात मार्गदर्शन केले. तर माधुरी गोटे यांनी प्लि बार्गेनिंग अर्थात विनंती सौदा या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधीक्षक व तुरुंग अधिकारी रवींद्र जगताप यांनी तर कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा कारागृहाचे ललित मुंडे यांनी मानले.