अंतरगाव येथे हागणदारी मुक्तिचा बोजवारा

अंतरगाव येथे हागणदारी मुक्तिचा बोजवारा

◾स्वच्छ भारत मिशन योजनेला हरताळ
◾कारवाही साठी लावला फलक; मात्र नियोजन शून्य.
◾ गावात दुर्गंधीचे साम्राज्य..

*सिंदेवाही :-* पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव येथे हागणदारी मुक्ती साठी ग्राम पंचायत कडून उघड्यावर शौचाला बसणाऱ्या व्यक्तीवर कारवाही करण्याचा चौका चौकात फलक लावूनही उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने गावात घाणीचे साम्राज्य पसरून सर्वत्र दुर्गंधी झाली असल्याने या गावात हागणदारी मुक्तीचा पूर्णतः बोजवारा उडाला असून स्वच्छ भारत मिशन योजनेला हरताळ फासला असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
पूर्वी शौचालय बांधकाम करण्यासाठी विविध योजनेमार्फत लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त होत होते. मात्र त्यानंतर शासनाने स्वच्छ भारत मिशन ही योजना अस्तित्वात आणून पुन्हा एकदा हागणदारी मुक्तीला नव्या जोमाने सुरुवात केली. गावागावातील प्रत्येक घरात शौचालय, आणि त्या शौचालयाचा नियमित वापर करण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून अभियान राबविले. सिंदेवाही तालुक्यात स्वच्छ भारत मिशनच्या प्रारंभीच्या लक्षांकानुसार, तसेच बेसलाईन मधून सुटलेले, आणि वाढीव लाभार्थी पैकी अनेक गावात शौचालयाचे १०० टक्के अनुदान प्राप्त झाले. दरम्यान अंतरगाव येथील लाभार्थ्यांनी कागदोपत्री शौचालयाचे बांधकाम दाखवून १०० टक्के अनुदान हडप केले आहे. याला जबाबदार कोण ? शौचालयाचे बांधकाम न केल्याने आता उघड्यावर शौचाला जाण्याची पाळी आली असून अनेकजण गावशेजारी शौचास बसत असल्याने रस्त्यावर घाण पसरून गावात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ग्राम पंचायत कार्यालयाने उघड्यावर शौचाला बसणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा चौकाचौकात फलक लावला. त्यामुळे प्रसार माध्यमांनी या ग्राम पंचायत चे अभिनंदन करत अनेक वर्तमान पत्रातून बातम्या प्रसिद्ध केल्या. मात्र आतापर्यंत कोणत्याही नागरिकांवर दंडात्मक कारवाई झाली नाही. तसेच प्रस्तुत प्रतिनिधी यांनी ग्राम पंचायत सरपंच यांची भेट घेतली असता नागरिकांना भीती दाखविण्यासाठी कारवाहीचा फलक लावण्यात आला असे सांगितले. असे असले तरी अंतरगावात बाहेर रस्त्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून गावातून ये जा करणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्वच्छ भारत मिशनच्या पायाभूत सर्वेक्षणानुसार या गावात १०० टक्के शौचालय झाले असल्याची पंचायत समितीच्या दप्तरी नोंद दिसून येते. मात्र तरीही सिंदेवाही तालुक्यात अंतरगाव सर्वात घाणेरडे गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. याला जबाबदार कोण? याबाबत पंचायत समिती स्तरावरून योग्य चौकशी करून दोषींवर कडक कारवाही करावी. अशी मागणी प्रसिद्धी माध्यमातून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया
गावातील अनेक नागरिक उघड्यावर शौचाला बसून रस्त्यावर घाण करीत असतात. म्हणून ग्राम पंचायत कडून दंडात्मक कारवाई करण्याचा फलक लावून नागरिकांना भीती दाखविण्यात आली. मात्र त्याचाही काहीच परिणाम झाला नाही. ग्राम पंचायत चे इतर पदाधिकारी सहकार्य करीत नसल्याने बाहेर उघड्यावर शौचाला बसणाऱ्या व्यक्तींसाठी सकाळी पहारा ठेवून बंदोबस्त करण्यास अडचण येत आहे.

दिपाली ढाले
सरपंच ग्राम पंचायत अंतरगाव