६०८३ पथविक्रेत्यांना मिळाला १० हजार रुपये कर्जाचा लाभ

६०८३ पथविक्रेत्यांना मिळाला १० हजार रुपये कर्जाचा लाभ    

चंद्रपूर ३० ऑक्टोबर  – प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ६०८३ पथविक्रेत्यांनी घेतला असुन ९०५ विक्रेत्यांना २० हजार रुपये तर १०७ लाभार्थ्यांना ५०,००० रुपयांचे कर्ज प्राप्त झाले आहे.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने मनपाकडुन विशेष शिबिरे देखील आयोजीत करण्यात आली होती.
योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते.  शहरातील राष्ट्रीयकृत बँक  या पथविक्रेत्यांनी केलेल्या अर्जाची छाननी करतात व विहीत मुदतीत अर्ज निकाली काढुन प्रकरणे मंजुर करण्याची प्रक्रिया करतात. जे पथविक्रेते नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना बँकेकडून २० हजारांचे अतिरीक्त कर्ज उपलब्ध केले जाते.
चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असुन अधिक माहीतीसाठी दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान कार्यालय, बीपीएल ऑफिस,ज्युबली हायस्कूल समोर येथे संपर्क साधण्याचे आवाहन  महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.