चंद्रपूर : तृतीय पंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना

तृतीय पंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात

जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना

Ø  तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्था व्यक्तींनी संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 22 जुलै : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारी संदर्भात कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त हे समितीचे सदस्य सचिव आहेत.  

सदर समितीमध्ये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेली सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक व्यक्ती तसेच तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत  संस्थेतील 2 तृतीयपंथीय व्यक्तिंचा ( त्यापैकी किमान एक व्यक्ती ट्रान्सवुमन असणे आवश्यक) चा समावेश आहे. त्यामुळे तृतीय पंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही आहेत समितीची उद्दिष्टे : तृतीयपंथीयांच्या तक्रारीचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करणे.

असे आहे समितीचे कार्य : प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करणे, जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे विहित कालावधीत निवारण करणे, तक्रारीबाबत पडताळणी करून आवश्‍यकतेनुसार विभागीय तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळास शिफारस करणे तसेच समितीने तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या अडचणींचा, समस्यांचा व तक्रारींचा सखोल अभ्यास करणे व योग्य त्या उपाययोजना शासनास सुचविणे आदी बाबींवर समिती कार्य करणार आहे.