मेडिकलचा नेत्रचिकित्सा उपचार विभाग सुसज्ज करण्यासाठी सहकार्य करणार

मेडिकलचा नेत्रचिकित्सा उपचार विभाग सुसज्ज करण्यासाठी सहकार्य करणार

केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याशी केली दूरध्वनीवरून चर्चा

नेत्रदान जागृती पंधरवड्याचा ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर, दिनांक २४ ऑगस्ट:  नेत्रदान हे पवित्र कार्य आहे; देशात अंध व्यक्तींची संख्या आणि दृष्टीदान करणारे व्यक्ती यामध्ये तफावत असून नागरिकांत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून आयोजित विशेष अभियानात जनसहभाग वाढावा अशी अपेक्षा व्यक्त करुन, नागपुरात नेत्रचिकित्सा व उपचार करण्यासाठी अद्ययावत सोयी उपलब्ध व्हाव्यात, सुसज्ज नेत्रपेढी उभारावी, प्रादेशिक नेत्रचिकित्सा संस्थान व्हावे यासाठी पुढाकार घेईल असे आश्वासन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
शासनाच्या वतीने २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या नेत्रदान जागृती पंधरवड्याचा शुभारंभ आज नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ राज गजभिये,  नेत्रचिकित्सा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सौ. डॉ मीनल व्यवहारे, डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ शरद कुचेवार, डॉ. ए. एच. मदान आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची उपराजधानी असलेले  नागपूर हे आरोग्य आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. महाराष्ट्रासह  लगतच्या मध्यप्रदेश, छतिसगढ, तेलंगणा राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी येतात. येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात  इतर आजारांशी निगडित हजारो रुग्ण येतात तसेच नेत्ररुग्ण देखील मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. त्यामुळे वैद्यकीय सुविधा अद्ययावत आणि सक्षम असायला हव्या.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या नेत्र चिकित्सा विभागाला अधिक अद्ययावत करण्याच्या दृष्टीने येथे  प्रादेशिक नेत्रचिकित्सा संस्था आणि सुसज्ज नेत्रपेढी स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा नियोजन विकास निधी तसेच सीएसआर च्या माध्यमातून देखील आवश्यक ते सहकार्य मी करायला तयार आहे.
डॉ मीनल व्यवहारे यांनी प्रास्ताविक करताना अभियानाचे महत्व व उपक्रम विषद केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या नेत्रदान जागृती रॅली ला ना सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
कार्यक्रमाला विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

——-बॉक्स—–

केंद्रीय मंत्री डॉ भारती पवारांना केला तातडीने फोन !

प्रादेशिक नेत्रचिकित्सा संस्था व सुसज्ज नेत्रपेढी नागपुरात  स्थापन करण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून सहकार्य करा  अशी विनंती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ भारती पवार यांना केली. यासंदर्भात मेडिकलच्या वरिष्ठ विभागप्रमुखांशी चर्चा सुरू असतानाच ना. मुनगंटीवार यांनी डॉ. पवार यांना मोबाईलवरून कॉल केला. डॉ भारती पवार यांनीदेखील लगेच प्रतिसाद देत प्रस्ताव आल्यानंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांना दिले.