जिल्हा कारागृहात तणावमुक्ती व्यवस्थापन व योगासन या विषयावर मार्गदर्शन

जिल्हा कारागृहात तणावमुक्ती व्यवस्थापन व योगासन या विषयावर मार्गदर्शन

चंद्रपूर, दि. 20 : सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृहाचे ब्रीदवाक्य आहे. कारागृहातील बंद्याकरीता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून व पूर्व विभाग नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनात स्ट्रेस रिलीज फाउंडेशन, पुणे यांच्या विद्यमाने चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये पुरुष व महिला बंदी तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांकरीता “तणावमुक्ती व्यवस्थापन व योगासन” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतीश सोनवणे, नागेश कांबळे, प्रकाश लोमटे, ज्योती आठवले तसेच कारागृहातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

 कारागृह सेवा ही अतिशय संवेदनशील सेवा असून कारागृहामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी बंदिस्त असतात. कारागृहामध्ये येणाऱ्या बंद्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये बदल घडविणे तसेच बंद्यांत सुधारणा व पुनर्वसनाच्या दृष्टीने कार्य करण्यात येते. दिवस-रात्र कारागृह कर्मचारी यांना कैद्यांच्या सहवासात राहावे लागते, त्यामुळे नकळत कारागृह कर्मचाऱ्यांना मानसिक ताण-तनावास सामोरे जावे लागते. तसेच आजच्या धावपळीच्या युगात कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

या कार्यक्रमात अशोक देशमुख यांनी जिल्हा कारागृहातील पुरुष व महिला बंद्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना तणावमुक्ती व योगासनाचे महत्त्व पटवून देत त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच निरंतर योगासन करून शरीर कसे आरोग्य संपन्न बनविता येईल व तणावमुक्त जीवनशैली कसे जगता येईल, याचा मंत्र समजावून सांगितला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक संजीव हटवादे तर आभार नागेश कांबळे यांनी मानले.