chandrapur I ग्रामीण भागाच्या विकासाकरिता यंत्रणांनी कामाची गती वाढवावी : खासदार बाळू धानोरकर

ग्रामीण भागाच्या विकासाकरिता यंत्रणांनी कामाची गती वाढवावी : खासदार बाळू धानोरकर

दिशा समितीची आढावा बैठक

चंद्रपूर, दि. 22 फेब्रुवारी : ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम करण्याकरिता सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी कामाची गती वाढवाववी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी आज नियोजन भवन चंद्रपूर येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत केले.

या बैठकीत महात्मा गांधी राट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अंत्योदन योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, आवास योजना, ग्रामीण पाणी पुरवठा, पीक विमा, राष्ट्रीय आरोग्य अभियान, इंदिरा आवास योजना, घरकुल शहरी व ग्राम ज्योती विद्युत योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वुध्दापकाळ निवृत्ती योजना, विधवा निवृत्ती वेतन, अपंग निवृत्ती वेतन, राष्र्टीय कुटुंब लाभ योजना यासारख्या महत्वाच्या विषयाच्या आढावा घेतला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग तीन मध्ये 176 किमीच्या रस्त्यांची अंदाजपत्रके तयार झाली आहेत. पुलाचे सर्वेक्षण व अंदाजपत्रकाच्या कामांना गती देऊन तातडीने कामे पूर्ण करावी अशी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

यावेळी समितीचे अध्यक्ष म्हणून खा. धानोरकर बोलत होते. याप्रसंगी आ. प्रतीभा धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, प्रकल्प संचालक गिरवे व भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक शंकर किरवे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करुन मागील इतिवृत्ताची माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.