विकासाच्या बाबतीत जिल्ह्याला प्रथम प्राधान्य- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

विकासाच्या बाबतीत जिल्ह्याला प्रथम प्राधान्य– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

Ø पाच दिवसीय माता महाकाली महोत्सवाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 19 : चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्राला वेगळी ओळख दिली आहे. सर्वात जास्त उद्योगधंदे या जिल्ह्यात असून ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. हा जिल्हा बहुतांश ग्रामीण आणि राज्याच्या कोपऱ्यात असला तरी या जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली. श्री. माता महाकाली महोत्सव ट्रस्ट, चंद्रपूरच्यावतीने पाच दिवसीय माता महाकाली महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी, माता महाकाली महोत्सव समितीचे संयोजक तथा आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदूखे, आशा महाकाले, डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, मधुसुदन रुगंठा, ॲड. विजय मोगरे, नंदु खनके, अजय जयस्वाल, बलराम डोडाणी यांच्यासह माता महाकाली महोत्सव समितीचे सदस्य तसेच सराफा असोसिएशनच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

महाकाली मातेचे दर्शन घेण्याची संधी आणि चंद्रपूरकरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आज येथे आलो असल्याचे सांगून ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले, या नवरात्रोत्सवात अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. मात्र, आजच्या कार्यक्रमाची ख्याती काही वेगळीच आहे. विमानतळापासून तर मंदिरापर्यंत चंद्रपूर शहराला सजविण्यात आले आहे. चंद्रपूरवासियांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. त्यांच्याकडे बघितल्यावर असा भाव दिसून येतो जणू आजच दिवाळी आहे. ही प्रथा व परंपरा कायम ठेवून हा उत्साह चंद्रपूरवासियांमध्ये कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी आयोजकांना केले. तसेच देखण्या व प्रभावशाली कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले, या देवस्थानाची एक वेगळी ओळख आहे. भारतात अनेक जुन्या वास्तू आहेत, त्यासर्व वास्तूंमध्ये ही प्राचीन वास्तू पहावयास मिळते. प्राचीन काळापासून अस्तित्वात असणाऱ्या या मंदिराचा गाभारा आणि गाभाऱ्याचा बाहेरचा मंदिराचा परिसर निर्माण केला गेला आहे. या सर्व वास्तूंनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर त्याहून प्राचीन काळापासूनचा इतिहास अनुभवला आहे. त्यामुळे अशा वास्तूचे जतन करण्याचे कार्य चंद्रपूरकरासह येथील ट्रस्ट तसेच लोकप्रतिनिधींनी केले आहे. त्यांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

देशाला संस्कृतीची राजधानी म्हणून ओळखले जाते. अशा प्राचीन संस्कृतीचे जतन केल्यामुळे भारत देशाला वेगळी ओळख संपूर्ण जगात प्राप्त झाली आहे. आज हा देश संस्कृतीचा आधार घेत जगात अत्यंत प्रगतशीलपणे पुढे जात आहे. भारत देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर चंद्रापर्यंत झेप घेत अत्यंत यशस्वी मिशन देशाने राबवून या जगात आपली नवी ओळख निर्माण केली आहे, याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. त्यासोबतच या जिल्ह्यात दीक्षाभूमी आहे. शासनाला या दीक्षाभूमीचा विकास करणे क्रमप्राप्त आहे. येणाऱ्या अधिवेशनात याकरीता वैयक्तिकरीत्या पाठपुरावा करून जिल्ह्याला अपेक्षित असणारे कार्य लवकरात लवकर करून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रास्ताविकेत बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले, मागील वर्षीपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. चंद्रपूर हा महाराष्ट्राला ऊर्जा देणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातून 30 टक्के ऊर्जानिर्मिती या जिल्ह्यातून केली जाते. या जिल्ह्यात राहणारे नागरिक सुद्धा ऊर्जावान आहे. स्व. बाबा आमटे यांचे आनंदवन या जिल्ह्यात असून सेवा करणारा हा जिल्हा आहे. तसेच जगातील सर्वाधिक वाघ या जिल्ह्यात असून वाघासारखाच शक्तिमान हा जिल्हा आहे. त्यासोबतच 11 किलोमीटरचा परकोट या जिल्ह्याला लाभला असून भारतात अशी ठिकाणे फार कमीच असतील असेही ते म्हणाले.

माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना:  

श्री माता महाकाली महोत्सवाच्या उदघाटन समारंभ कार्यक्रमाप्रसंगी महाकाली मातेची पालखी काढण्यात आली. या पालखीतून 8 किलो चादींच्या मुर्तीची विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधिवत पुजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली.

चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन तथा पाहणी :  

महाकाली मंदीर परीसरात विविध शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रकला प्रदर्शनीचे उदघाटन महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी सदर चित्रकला प्रदर्शनीची पाहणी केली.

नवरात्रात जन्मलेल्या नवकन्यांच्या पालकांचा सत्कार :  

नवरात्रात कन्यारत्न प्राप्त झालेल्या पालकांचा सत्कार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते चांदीचा शिक्का देऊन करण्यात आला. त्यासोबतच पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्राप्त परीचारिका पुष्पाताई पोडे, डॉ. रविकांत खोब्रागडे, शर्वरी गुंडावार यांना शॉल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अलका ठाकरे तर आभार मिलींद गंपावार यांनी मानले.