शेतकरी प्रशिक्षण व कृषि प्रदर्शनीचे आयोजन

शेतकरी प्रशिक्षण व कृषि प्रदर्शनीचे आयोजन

            भंडारा,दि.24: जिल्ह्यामध्ये ऊस, धान, भाजीपाला व फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. या पिकांवर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होते तसेच किडी व रोगांपासून पिक संरक्षण करिता फार खर्च होतो तो खर्च कमी करता यावा या दृष्टीकोनातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारातर्फे शेतकरी प्रशिक्षण व कृषि प्रदर्शनीचे आयोजन   नुकतेच करण्यात आले होते.

            या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. उषा डोंगरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, साकोली, भंडारा तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेंद्र काटकर, विभाग प्रमुख,मृदाशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर तसेच सौ. संगीता सव्वालाखे, संचालक, विदर्भ बायोटेक लॅब, यवतमाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. छाया कापगते, कृषि अधिकारी, कृषि विभाग, साकोली, ताराचंद लंजे, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृ.वि.के. साकोली, कु. रजनीगंधा टेंभूरकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, साकोली उपस्थित होते.

              कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांचे फुल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ. राजेंद्र काटकर, विभाग प्रमुख, मृदाशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर यांनी पिकामधील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व उपाय योजना, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पिक पोषना मध्ये भूमिका, महत्व, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थित शेतकऱ्यांच्या शंकांचे निरासरण केले.

            दुसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये सौ. संगीता सव्वालाखे, संचालक, विदर्भ बायोटेक लॅब, यवतमाळ जैविक पद्धतीने किड व रोग व्यवस्थापन या विषयावर सादरीकरण केले. तसेच जैविक निविष्ठा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या नंतर डॉ. प्रशांत उंबरकर, विषय तज्ञ (किटकशास्त्र) यांनी किड व्यवस्थापनामध्ये निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क चा वापर या विषयावर सविस्तर माहिती दिली.

               अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना डॉ. उषा डोंगरवार यांनी सदर वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्ठिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे या दृष्टीकोनातून तृणधान्य पिकाविषयी माहिती देऊन त्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्रामध्ये आयोजित प्रदर्शनीचा लाभ घेतला.

            कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रशांत उंबरकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. योगेश महल्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री. प्रमोद पर्वते, डॉ. प्रवीण खिरारी, कु. कांचन तायडे, श्री. लयंत अनित्य, श्री. कपिल गायकवाड, श्री. सोमनाथ गवते, श्री. मुकेश सुखदेवे व कु. आशा इडोळे तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभवचे  विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न केले.