राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारु विरोधात मोहीम Ø कार्यवाहीत 2,24,895 किंमतीचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारु विरोधात मोहीम

Ø कार्यवाहीत 2,24,895 किंमतीचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर, दि. 25 ऑगस्ट : राज्य उत्पादन शुल्क, नागपूर विभागाचे विभागीय उपआयुक्त यांच्या आदेशान्वये, दि. 22 व 23 ऑगस्ट 2022 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारु विक्री व हातभट्टी दारु निर्मिती, विक्री विरोधात मोहीम उघडण्यात आली होती. त्याअनुषंगाने चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व जवान कर्मचाऱ्यांसमवेत भद्रावती, चिमूर, चंद्रपूर, सावली, नागभीड, गडचांदुर, सिंदेवाही, वरोरा, बल्लारपूर, ब्रह्मपुरी व राजुरा तालुक्यात धाडी टाकून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत एकूण 29 गुन्हे नोंदविण्यात आले.

या गुन्ह्यांमध्ये एकूण 24 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून देशी दारूचा एकूण 262.58 लिटर मद्यसाठा, विदेशी दारूचा 3.46 लिटर, हातभट्टी गावठी दारू एकूण 82 लिटर, मोहासडवा रसायन 4,910 लिटर त्याचप्रमाणे एकूण 62 लिटर उकडते रसायन जप्त करण्यात आले. संपूर्ण कार्यवाहीमध्ये एकूण रु. 2 लक्ष 24 हजार 895 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील देशी दारू, बियर शॉपी व वाईन शॉप अनुज्ञप्त्यांचे निरीक्षण करून तीन अनुज्ञप्त्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याने विभागीय गुन्हे नोंदविण्यात आले. सदर कामगिरी राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे यांच्या आदेशान्वये राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूरचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक एम. एस. पाटील, विकास थोरात, भरारी पथकाचे ईश्वर वाघ, दुय्यम निरीक्षक श्री खांदवे, श्री. आक्केवार, अमित क्षीरसागर, श्री. लिचडे, जगदीश पवार, मोनाली कुरुडकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.