अकोला कृषी विद्यापिठात शेतकऱ्यांसाठी शिवार फेरी,पीक प्रात्यक्षिक व चर्चासत्राचे आयोजन

अकोला कृषी विद्यापिठात शेतकऱ्यांसाठी शिवार फेरी,

पीक प्रात्यक्षिक व चर्चासत्राचे आयोजन

Ø 30 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शिवारफेरी भेटीचे नियोजन

चंद्रपूर, दि. 26 : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ, अकोला येथे विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधून दि. 29 व 30 सप्टेंबर तसेच 1 ऑक्टोबर, 2023 रोजी तीन दिवसीय शिवार फेरी, थेट पीक प्रात्यक्षिक तसेच चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमाचे उदघाटन दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, कृषिमंत्री धनजंय मुंडे यांची उपस्थिती असणार आहे.

थेट पीक प्रात्यक्षिक कार्यकमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकरी, संशोधक, धोरणकर्ते आणि उदयोग भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी अत्याधुनिक कृषी पद्धती जाणून घेणे आणि शाश्‍वत, पर्यावरणास अनुकुल पद्धतीची खात्री करून पीक उत्पादकता वाढविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे होय.

या तीन दिवसीय शिवार फेरीमध्ये 220 खरीप पीक उत्पादन तंत्राचे 20 एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट प्रात्यक्षिके जसे,  तृणधान्य, कडधान्य, कापूस, सोयाबीन, फळपिके, फुल पिके, चारापिके, धानपिके आणि त्यांचे तंत्रज्ञान आदी तसेच 16 खाजगी कृषिनिविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके, विद्यापिठाच्या विविध संशोधन विभागाचे 1 हजार 100 हेक्‍टर क्षेत्र शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणुन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच  जिल्हाविषयी कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने आणि संधी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.  शिवारफेरीमध्ये उपस्थित शेतक-यांची एकाच वेळी गर्दी होवु नये म्हणुन जिल्हानिहाय कार्यक्रम सुनिश्‍चीत करण्यात आला आहे.

त्यानुसार चंद्रपूर जिल्हयातील शेतकरी बांधवांसाठी 30 सप्टेंबर 2023 रोजी शिवारफेरी भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु- भगिनींनी या भव्य शिवारफेरीला भेट देऊन प्रात्यक्षिकासह विविध तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन येणारा हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार  यांनी केले आहे.