आदिवासी विभागातर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सुवर्णसंधी · 20 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करा

आदिवासी विभागातर्फे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सुवर्णसंधी

· 20 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करा

भंडारा, दि. 30 : आजचे युग हे स्पर्धा परीक्षांचे असून स्पर्धा परीक्षांमध्ये योग्य प्रशिक्षणाअभावी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आजही ग्रामीण भागात त्यातही आदिवासी समाजामध्ये अल्प आहे. त्यामुळे आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता नागरी सेवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी होण्याची संधी मिळावी म्हणून आदिवासी कुटुंबातील विद्यार्थ्याना आता आयएएस, आयपीएस होण्याची संधी आदिवासी विकास विभाग, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 100 अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा संपुर्ण तयारीकरीता दिल्ली येथील नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देणे या योजनासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून हे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे. सदर योजनेचा सविस्तर तपशिल, शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतच्या अधिक माहितीकरीता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI) च्या अधिकृत संकेतस्थळ https://trti.maharashtra.gov.in ला भेट देऊन संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन स्वरुपातच अर्ज करावेत. सदर प्रशिक्षणासाठी निवड ही सामायिक प्रवेश परीक्षा (Comman Entrance Test-CET) व्दारे गुणांकन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्याकरीता भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यानी अर्ज सादर करुन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडाराचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.