शिकविण्याचा आनंद निर्मळ – आयुक्त श्री. विपीन पालीवाल

शिकविण्याचा आनंद निर्मळ – आयुक्त श्री. विपीन पालीवाल
शिक्षक दिनी आदर्श शिक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारचंद्रपूर ६ सप्टेंबर – शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवितांना त्यांना माणुस म्हणुन घडविणे गरजेचे आहे. शिक्षक हा देशाची संस्कारी पिढी उभारणारा अधिकारी असुन  लहान मुलांना शिकवितांना जो आनंद प्राप्त होतो तो निर्मळ असल्याचे प्रतिपादन आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शिक्षक दिनी शाळेचा उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक,चालु वर्षातील सेवानिवृत्त शिक्षक, १० वी व एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मनपा राणी हिराई सभागृहात आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आला होता.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त म्हणाले की, मनपाच्या २७ शाळा आहेत काही सुस्थितीत आहेत तर काही चांगल्या करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शाळांच्या भौतिक सुविधेसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मनपाच्या शाळांमधील विद्यार्थी हे अधिकतर गरीब घरातील असतात.त्यांच्या समस्या जाणुन घेऊन त्यांना शिक्षणास प्रोत्साहीत करणे हे शिक्षकांचे काम आहे.
मनपा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक शाळेच्या पटसंख्येत वाढ केली आहे.  ज्याप्रमाणे शिक्षण हे व्यक्तीचे बलस्थान असते त्याप्रमाणे शिक्षण विभाग मनपाचे बलस्थान झाले आहे, यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. यापुढे मनपा शाळा खाजगी शाळांची बरोबरी करतील इतक्या दर्जेदार बनविण्याचे आवाहन आपल्यापुढे आहे आणि ते शिक्षकांच्या मदतीने पूर्ण होईल यात शंका नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
याप्रसंगी विधानपरिषद सदस्य श्री. सुधाकर अडबाले यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांचा उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत शिक्षक भास्कर गेडाम,वसुंधरा कामडे,१० वीचा उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक भास्कर गेडाम,एम सत्यवती नारायण,एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक उमा कुकडपवार, जोगेश्वर मोहारे, सेवानिवृत्त शिक्षक शारदा अशोक धांडे,निर्मला हाजरा तसेच १० वीत चांगले गुण मिळविणारे ११ विद्यार्थी व एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या २९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. प्रास्ताविक नागेश नीत तर संचालन स्वाती बेतावार यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, मुख्यलेखाधिकारी मनोहर बागडे ,शहर अभियंता महेश बारई, डॉ. अमोल शेळके,प्रशासन अधिकारी नागेश नीत तसेच सर्व मुख्याध्यापक,शिक्षकगण,विद्यार्थी उपस्थीत होते.