शाश्वत विकासासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

शाश्वत विकासासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

भंडारा दि.15: विकास ही सामुहिक प्रक्रीया असून शाश्वत विकासासाठी नागरिकांनी प्रशासन करत असलेल्या  प्रयत्नांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज केले.

पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापनदिनानिमीत्त आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, खासदार सुनिल मेंढे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्त्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, यांच्यासह  प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भंडारावासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात श्री. कुंभेजकर यांनी जिल्हयातील  विकास कामांचा  आढावा मांडला. त्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानात 95 गावात कामे सुरू असून  गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार योजनेमध्ये 14 हजार घनमीटर गाळ काढल्याचे सांगितले.

प्रशासकीय पातळीवर सध्या गतीमान पध्दतीने नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी प्रशासन बांधिल असुन महसुल सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात 8 अनुकंपाधारकांना थेट तलाठी संवर्गात नियुक्तीपत्रे त्यांच्या हातात देण्यात आली. तर या संपुर्ण सप्ताहात फोकस ॲप्रोच ठेवून नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे 71 प्रस्ताव शासनामार्फत मंजूर झाले असून  त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. शासनाच्या नवीन वाळु धोरणानुसार जिल्हयातील 11 वाळु डेपो ई-लिलावात गेले आहेत. या डेपोमार्फत 62 हजार ब्रास वाळु सामान्य नागरिकांना 600 रूपये प्रति ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आली. सद्या 7 हजार ब्रास वाळु या डेपोमध्ये उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला सन्मान योजनेचा 5 लाखाहून अधिक माता-भगीनींनी जिल्ह्यात लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे कष्टकरी वर्गातील महीलांना अर्ध्या तिकीट दरात प्रवास करता येतो. महिलांच्या अर्थसाक्षरतेला बळ देण्यासाठी हे स्त्री सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणाईने मादक पदार्थाचे सेवनापासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी केले.