मनपाद्वारे निःशुल्क राष्ट्रध्वज वितरण सुरु जवळपास ६० हजार घरी वितरीत होणार ध्वज

मनपाद्वारे निःशुल्क राष्ट्रध्वज वितरण सुरु
जवळपास ६० हजार घरी वितरीत होणार ध्वज

चंद्रपूर ११ ऑगस्ट –  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करीत असताना जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती चिरंतन तेवत रहाव्यात तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना मनात कायम रहावी या भावनेने आपल्या इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्याच्या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जात आहे. उपक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे घरोघरी निःशुल्क ध्वज वितरण करणे सुरु करण्यात आले असुन जवळपास ६० हजार घरी राष्ट्रध्वज वितरीत केले जाणार आहे.
आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत संपुर्ण देशात व राज्यात मेरी माटी मेरा देश म्हणजेच माझी माती माझा देश अभियान दि.९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान व हर घर तिरंगा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. चंद्रपूर महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त घरांवर नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने तिरंगा फडकविणे या उपक्रमांतर्गत अपेक्षित आहे. याअंतर्गत महिला बचत गट, आशा वर्कर, एनएमएम,मनपाचे कर निरीक्षक यांच्याद्वारे परिसर निश्चित करून ध्वज वितरण करण्यात येत आहे.
राष्ट्रध्वज हे कोणतेही मुल्य न स्वीकारता वितरीत करण्यात आहे,मात्र कुणी रुपये २५ हे स्वागतमुल्य स्वेच्छेने देत असेल तर ते स्वीकारण्यात येईल व अश्या स्वागतमुल्य देणाऱ्या व्यक्तींकडुन प्राप्त निधीचा वापर मनपा शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी करण्यात येणार आहे.तिरंगा घरी उंचावतांना राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान होईल या दृष्टीने ध्वजसंहितासुद्धा देण्यात येत आहे.
आपल्या देशाबद्दल प्रत्येकाच्या मनात असलेला आदर व सन्मान अभिव्यक्त करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ हा  अतिशय अभिनव उपक्रम ही एक चांगली संधी असून यामध्ये नागरीकांनी सक्रीय सहभागी होऊन आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत तिरंगा उंचवावा असे आवाहन महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या वतीने करण्यात येत आहे.