गेल्या दहा वर्षांतील खासदार नेतेंचे एक विकास काम दाखवा आणि बक्षीस मिळवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 

गेल्या दहा वर्षांतील खासदार नेतेंचे एक विकास काम दाखवा आणि बक्षीस मिळवा – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 

गडचिरोली मतदार संघातील संवेदनशील अश्या कोरची तालुक्यात प्रचार

येथे माणसे राहतात की जनावर…?
लोडशेडींग वरून विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केली टीका

भाजपपुढे झुकून मुजरा करणाऱ्या राजाला स्वाभिमान काय माहीत, विजय वडेट्टीवार यांची मंत्री आत्राम यांच्यावर टीका

कोरची – जनतेला खोटी आश्वासने देऊन मूर्ख बनविणाऱ्या भाजपने सत्ता आल्यावर देश लुटण्याचे काम केले. तर स्थानिक खासदारांनी दहा वर्षात एकही लोकोपयोगी कार्य केले नाही. उलट पतसंस्था उघडून त्यातून हजारो लोकांची आर्थिक पिळवणूक केली. खासदार अशोक नेते यांचे गेल्या दहा वर्षातील एक विकास काम दाखवा आणि बक्षीस मिळवा असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील अश्या कोरची तालुक्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ नामदेव किरसान यांनी प्रचार केला.

दुर्गम भागात अकरा तास लोड शेडिंग करून जनतेला जनावराप्रमाणे वागवणारे आता मते मागायला येत आहे.भाजपचे निष्क्रिय खासदार काही काम न करता आता मोदींच्या नावाने मत मागत आहेत अश्या खासदाराला घरचा रस्ता दाखवून इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच्या उच्चशिक्षित प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या डॉ. नामदेव किरसान यांना निवडून देऊन आपल्या लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करा,असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

इंडीया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल,माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, भारिप नेते रोहिदास राऊत, सेवा दल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, रा. कॉ. ता अध्यक्ष प्रतापसिंह गजबिये, कमुनिष्ट पक्षाचे अमोल मारकवार, काँग्रेसचे परसराम टिकले, रामदास मसराम, अविनाश गेडाम, माजी नगराध्यक्ष मोहबंशी, अमोल नरोटे, सदरू बामानी, हकीमुद्दिन शेख,रामदास साखरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, प्रमोद पत्रे, राजरत्न मेश्राम, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड प्रमाणात फोफावली आहे. तर विविध कर आकारून जनतेची लूट सुरू आहे. कोरची या भागात दिवसाला अकरा तास लोड शेडिंग सुरू आहे, भर उन्हाळ्यात सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासासाठी कोण जबाबदार आहे, असा सवाल विरोधी पक्षनेते यांनी उपस्थित केला..
या जिल्ह्यात प्रकल्प आले तरी स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळाले नाही. हे येथील खासदाराचे अपयश असून यात मात्र भोळीभाबडी जनता भरडली जात आहे.

आदिवासींच्या जमिनीच्या पट्ट्याचा प्रश्न असो किंवा विविध समाजाच्या आरक्षणानुसार त्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो, बेरोजगारांच्या हाती काम शेतकऱ्यांना हमीभाव, सिंचन प्रकल्प हे सर्व काँग्रेस काळातच झाले असून मोदी काळात फक्त जातीय तेढ निर्माण करून समाजात भांडणे लावण्यात आली आहेत. जमिनीच्या मूळ मालकाला वनवासी म्हणून संबोधन त्याची थट्टा करण्यात येत आहे. महिलांवरील, अत्याचार गुन्हेगारी, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून व्यापारी हित जोपासणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून व्यापाऱ्यांची कर्जमाफी केली ही लाजिरवाणी बाब आहे. असा निशाणा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचार सभेतून भाजपवर साधला.

भाजपपुढे झुकून मुजरा करणाऱ्या राजाला स्वाभिमान काय माहीत..?
विजय वडेट्टीवार यांची मंत्री आत्राम यांच्यावर टीका…

काँग्रेस नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे भाजपात प्रवेश करणार अशी टीका कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी केली. मंत्री आत्राम यांच्या या विधानाचा समाचार विरोधी पक्षनेते यांनी कोरची येथील प्रचार सभेत घेतला. भाजप पुढे झुकून मुजरा करणाऱ्या राजाला स्वाभिमान काय माहित? मी दलित, शोषित, ओबीसी, अल्पसंख्यांक समाजासाठी लढणारा कार्यकर्ता आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार स्पष्ट केले.

प्रचार सभेला लोडशेडिंगचा फटका…

आज गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील कोरची येथे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीची प्रचार सभा पार पडली. या सभेत दोनदा वीज पुरवठा खंडित होऊन सभेला लोडशेडिगचा फटका बसला. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करून सदर परिसरातील लोडशेडिंग थांबली नाही तर संबंधितांना असा जाब विचारू की लोडशेडिंचा किती त्रास होतो हे त्यांना समजेल, असा इशारा सरकार आणि प्रशासनाला दिला.