राजकीय विरोधक एकाच मंचावर येणे सुदृढ लोकशाहीचे प्रतीक! ‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचे प्रतिपादन

राजकीय विरोधक एकाच मंचावर येणे सुदृढ लोकशाहीचे प्रतीक!
आयएसीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे, १ ऑगस्ट २०२३

जगातील सर्वोत्तम राज्यघटनांचा एकत्रित परिपाक म्हणजे भारतीय राज्यघटना आहे. याच राज्यघटनेनूसार देशात असलेली लोकशाही अवघ्या विश्वात प्रसिद्ध आहे. लोकशाहीत काम करीत असतांना अनेक वैचारिक मतभेद असले तरी मनभेद नक्कीच नाही.याची प्रचिती मंगळवारी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यानिमित्त पुण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच मंचावर आल्याने सुदृढ लोकशाहीचे मुर्तीमंत उदाहरण देशाने बघितले,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष,ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केले.

‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करणारे उभय नेते या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानिमित्ताने एकत्रित आल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे. विरोधकांनी मात्र मोठे मन दाखवून या भेटीचे स्वागत केले असते,तर राज्यात अत्यंत सकारात्मक विचार पेरला गेला असता,असे मत पाटील यांनी व्यक्त केले.राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या विरोधक असलेले दोन व्यक्ती एकाच मंचावर येत असतील तर यात काही वावग नाही.पवारांनी त्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित राहू नये असा बालहट्ट करणाऱ्यांनी सोयीचे राजकारण केल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

मोदी आणि पवार सामाजिक दृष्टी एकच आहेत.राजकारणाऐवजी समाजकारणाला या नेत्यांनी प्राथमिकता दिली आहे.राजकारण आणि समाजकारण या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत.शरद पवारांना मोदी आपले मार्गदर्शक मानतात. गुरूच्या उपस्थितीत शिष्याचा सत्कार होणे गौरवाची बाब आहे, हे नक्की.सोहळ्यादरम्यान पवारांनी मोदींची पाठ थोपटून त्यांचा मनाचा मोठेपणा दाखवून दिला,हे विशेष.पंतप्रधानांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत केलेल्या समाज कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरन्विण्यात आले.