chandrapur I पाणी पुरवठयाशी संबंधित तक्रारींच्‍या निवारणासाठी तक्रार निवारण केंद्र स्‍थापन करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

पाणी पुरवठयाशी संबंधित तक्रारींच्‍या निवारणासाठी तक्रार निवारण केंद्र स्‍थापन करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

बल्‍लारपूर शहरातील पाणी पुरवठयाच्‍या प्रश्‍नासंदर्भात घेतली आढावा बैठक
 
पाणी पुरवठा हा नागरिकांच्‍या दृष्‍टीने अतिशय संवेदनशील विषय आहे. त्‍यामुळे पाणी पुरवठयाशी संबंधित तक्रारींचे निराकरण प्राधान्‍याने व्‍हावे यासाठी बल्‍लारपूर नगर परिषदेने तक्रार निवारण केंद्र निर्माण करून नागरिकांच्‍या समस्‍या सोडवाव्‍या असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
 
दिनांक १३ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहरातील पाणी पुरवठया संबंधीच्‍या तक्रारींच्‍या अनुषंगाने ऑनलाईन आढावा बैठक घेतली. या बैठकीला बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता सुशील पाटील, रेणुका दुधे, निलेश खरबडे, अजय दुबे, आशिष देवतळे, जयश्री मोहुर्ले, साखरा बेगम, येलय्या दासरप, स्‍वामी रायबरम, अरूण वाघमारे, आशा संगीडवार, अरूण भटारकर, काशीराम घोडमारे, पुनम मोडक आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
 
यावेळी आ. मुनगंटीवार यांनी नागरिकांच्‍या तक्रारींच्‍या अनुषंगाने नगर परिषद व महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण यांच्‍यातर्फे कार्यवाहीचा आढावा घेतला. एका महिन्‍याच्‍या आत एक्‍सप्रेस फिडर घेण्‍याचे निर्देश सुध्‍दा त्‍यांनी दिले. नळ बिलाच्‍या व्‍याजदरात सूट देण्‍याच्‍या दृष्‍टीने निर्भयदान योजना राबविता येईल काय यादृष्‍टीने तपासणी करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. पाणी पुरवठयाशी संबंधित तक्रारींच्‍या निवारणासाठी नगर परिषदेने सुचना फलकावर संबंधित कर्मचा-यांचे मोबाईल नंबर जाहीर करावे, असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.
 
पाणी पुरवठयाशी संबंधित नागरिकांच्‍या तक्रारी प्राधान्‍याने सोडविण्‍यात येईल व आ. मुनगंटीवार यांनी दिलेल्‍या निर्देशांच्‍या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्‍यात येईल असे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी यावेळी सांगीतले.