स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘मेरी माती मेरा देश’ अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत मेरी माती मेरा देश

अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. 27 : देशाला स्वांतत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. या महोत्सवाचा समारोप म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ‘मेरी माती मेरा देश….मिट्टी को नमन, विरों का वंदन’ हा उपक्रम मोठया उत्साहाने जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर उपक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा घेतला.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधुमनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, मनपा उपायुक्त अशोक गराटे, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, नेहरू युवा केंद्राचे समशेर बहादुर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले,  2021 पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. यावर्षी मातीला केंद्रबिंदू ठेवून कार्यक्रम साजरा करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत.  जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व तालुक्यातून माती गोळा केली जाणार असून ही माती एकत्रित करत एका कलशातून दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेली जाणार आहे. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून ‘अमृतवाटिका’ बाग तयार केली जाणार आहे. जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायती, 17 नगर परीषद/नगर पंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे. शासनाने घालुन दिलेल्या पंचसुत्री अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर व मनपा कार्यक्षेत्रात ध्वज उभारायचा आहे. ध्वजासोबत सेल्फी घेणे, वसुधा वंदन अतंर्गत प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे, विरों का वंदन अंतर्गत स्वांतत्र्य सैनिकांना नमन करणे व 15 ऑगस्ट रोजी शिलाफलकम ऊभारून राष्ट्रगिताचे गायन करावयाचे आहे.

जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, देशासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्य सैनिक, प्रत्येक सैन्य आणि निमलष्कराशी निगडित लोकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिवाय, प्रत्येक गावात 75 झाडे लावण्याचा कार्यक्रमही होणार आहे. शाळा व महाविद्यालयांना तसेच जिल्ह्यातील सामाजिक संस्थाना या उपक्रमात सहभागी करुन घ्यावे. पोलीस विभागाने पोलीस स्टेशन स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करावे. प्रत्येक गावस्तरावर करण्यात आलेले कार्य पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावर्षी जिल्ह्यातील नागरीकांनी यामध्ये सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले आहे.