मनपा शालेय विद्यार्थ्यांनी घेतला ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या प्रक्षेपणाचा अनुभव

मनपा शालेय विद्यार्थ्यांनी घेतला ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या प्रक्षेपणाचा अनुभव

 

चंद्रपूर १४ जुलै – चंद्रपूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेतील विद्यार्थ्यांना ‘चंद्रयान- ३’ मोहिमेचे इंटरनेटद्वारे प्रोजेक्टरवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. भारताचे यान अवकाशात झेपावणे व तो प्रोजेक्टरच्या माध्यमाने का होईना पण प्रत्यक्ष पाहणे हा मुलांसाठी आनंददायी व कुतूहलाचा विषय असल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन मनपातर्फे करण्यात आले होते.

‘चांद्रयान-3’ यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. जर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ही ऐतिहासिक भरारी यशस्वी झाली तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘सॉफ्ट लँडींग’ करणारा भारत देश हा एकमेव ठरणार आहे. या आधीचे सर्व यान चंद्राच्या भुमध्यरेखीय भागातच उतरले आहेत. त्यातल्या त्यात चीनचे ‘चांग ई-4’ मिशन या भागात दूरपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले एवढेच. पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप कुठल्याही देशाचे आपले यान उतरवलेले नाही. हा मान केवळ आणि केवळ भारताला मिळणार आहे आणि हेच ‘चांद्रयान-3’ चे वेगळेपण आणि वैशिष्ठ्य ठरणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना याप्रसंगी देण्यात आली.

श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन दुपारी 2.35 मिनिटांनी अवकाशाच्या दिशेने जसे चांद्रयान- ३ चे प्रक्षेपण अवकाशात झाले तसा विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करुन आनंद व्यक्त केला व भारतीय वैज्ञानिक,संशोधकांचे टाळया वाजवुन अभिनंदन केले. याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त मंगेश खवले,मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित यांची उपस्थिती होती.