सिंदेवाहीत नियम धाब्यावर बसवून ‘गुड मॉर्निंग’ लाच दारूविक्री.

सिंदेवाहीत नियम धाब्यावर बसवून ‘गुड मॉर्निंग’ लाच दारूविक्री.

◾संबंधित विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..!!

सिंदेवाही :- सहा वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आली. आणि सर्वत्र दारूचा महापूर सुरू झाला. जिकडे तिकडे परवाना धारक दुकाने सुरू झाले. दरम्यान सिंदेवाही शहरात सुद्धा देशी – विदेशी दारूचे परवाना धारक दुकाने लागले. मात्र मद्य विक्रीचे सर्व नियम धाब्यावर बसवून सिंदेवाही शहरात सकाळी सकाळी गुड मॉर्निंग करून सर्रास दारूची विक्री होत असल्याचे विदारक चित्र सुरू आहे.
उत्पादन शुल्क विभागाकडून देशी विदेशी दारूचा परवाना देताना काही नियम व अटी घालून दुकानदारांना दारू विक्रीचा परवाना दिला आहे. मात्र या सर्व नियमांना बगल देत सिंदेवाही सह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील दुकानात” गुड मॉर्निंग” लाच दारू विक्री करीत असल्याने सकाळच्या राम प्रहारी दारू ढोसनाऱ्या तळीरामाना अच्छे दिन आले असल्याचे दिसून येत आहे. हा गंभीर प्रकार सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेचे सोंग घेतले आहे. अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा हा दारू विक्रेत्यांच्या पत्थावर पडत असल्याने त्यांना आता सर्व रान मोकळेच झाले आहे. सिंदेवाही तालुक्यात नवरगाव, पळसगाव, वासेरा, गुंजेवाही, आणि सिंदेवाही येथे देशीदारू, आणि बियर बार यांची परवाना धारक दुकाने लागलेली आहेत. या दुकानांना दुकान सुरू आणि बंद करण्याच्या निर्धारित वेळा दिलेल्या आहेत. मात्र यातील काही दुकानदार वेळेचे बंधन असतानाही सकाळी सकाळी दुकानातून दारू विक्री करीत असल्याच्या दिसून येत आहे. परवाना धारक दारू विक्रेते आपल्या सोयीनुसार दारू विक्रीचा गोरखधंदा करीत असून राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. त्यामुळे तळीरामाना केव्हाही दारू ढोसण्याची नव पर्वानिच मिळाली आहे. हा सगळा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहित असूनही याकडे कानाडोळा करीत असल्याने उत्पादन शुल्क विभागाची जनतेमधील विश्र्वासहर्ता कमी झालेली आहे.