सक्रीय पालक सहभागातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळेल…

सक्रीय पालक सहभागातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळेल…

– जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे प्रतिपादन

 

भंडारा, दि. 4 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पालकांचा सक्रीय सहभाग महत्वाचा असून शाळापूर्व तयारी मेळाव्याच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाची प्रक्रिया गतिमान होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शाळापूर्व तयारी मेळाव्यात केले.

 

स्टार्स प्रकल्पांतर्गत शिक्षण विभाग, जिल्हा परिषद च्या वतीने जि.प व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये शाळापूर्व तयारी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती मोहाडी अंतर्गत जि. प. प्राथमिक शाळा वरठी क्र:2 व जि. प. उच्च प्राथ. शाळा एकलारी येथ शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी माता पालकांना संबोधित केले. कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे बालकांच्या शिक्षणात पडलेला खंड भरून काढण्याकरिता या अभियानाची सुरुवात झाली असली तरी माता पालकांचा आपल्या पाल्याला घडविण्यात नेहमी मोलाचं वाटा असतो. त्यामुळे त्यांनी आपल्या पाल्याला नियमित अभ्यासाची सवय लावावी. तसेच चांगल्या सवयीतून नैतिक मूल्यांची रुजवणूक करावी.

 

शाळा पूर्व तयारी मेळाव्यांतर्गत इयत्ता – पहिलीत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यासाठी लावण्यात आलेल्या सात स्टॉलची जिल्हाधिका-यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याकडून सर्व कृती समजावून घेतल्या. या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रवींद्र सोनटक्के, उपविभागीय अधिकारी वैष्णवी बी, पंचायत समिती मोहाडीचे सभापती रितेश वासनिक, जि प सदस्य एकनाथ फेंडर, गट विकास अधिकारी पल्लवी वाडेकर, नायब तहसीलदार श्री. चांदेवार, शिक्षण विस्तार अधिकारी विजय अदमाने, केंद्र प्रमुख अशोक खेताडे, विषय साधन व्यक्ती शारदा चौधरी, वंदना गाडे, आशा लांडगे, सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक अंगणवाडी सेविका, माता पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होते.