१५ जुलैपासुन ” सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस ” स्पर्धा  

१५ जुलैपासुन ” सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस ” स्पर्धा  

लोकसहभागातुन शहर सौंदर्यीकरणासाठी मनपाचे प्रयत्न

 

चंद्रपूर २७ जुन – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुदंर माझी ओपन स्पेस ” या २ स्वतंत्र स्पर्धा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. स्पर्धेची माहीती आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी २७ जुन रोजी मनपा राणी हिराई सभागृहात आयोजीत सभेत दिली.

१५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर ही वार्डस्तरीय स्पर्धा होणार असुन स्पर्धेची रूपरेषा व स्वरूप समजावून सांगण्यासाठी सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त अशोक गराटे,शहर अभियंता महेश बारई तसेच मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी, सामाजीक संस्था यांची उपस्थिती होती.

स्पर्धेत शहरातील उद्यान,बगीचे,मोकळी जागा (ओपन स्पेस ) यांची स्वच्छता,सौंदर्यीकरण व वृक्षारोपण करण्याचे उपक्रम राबविले जाणार आहे.सदर स्पर्धेत नागरिकांना गट बनवुन सहभागी होता येणार असुन प्रत्येक गटामध्ये कमीत कमी २५ सदस्य असणे आवश्यक आहे. सौंदर्यीकरण करण्यास मनपा मार्फत झाडे व पेंटिंग कलर (मर्यादित) पुरविण्यात येणार असुन इतर काही साहित्याची आवश्यकता असल्यास जसे सुरक्षा साधने इत्यादी मात्र त्या स्पर्धक गटाला स्वतः करावी लागणार आहे. स्पर्धेसाठी गुणांकन पद्धत निश्चित करण्यात आली असुन १५ दिवसाची सरासरी उपस्थिती तसेच कामाच्या तासांवर त्रयस्थ निरीक्षकांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.

उद्यान समिती,ओपन स्पेस विकास समिती,एनजीओ, स्वयंसेवी संस्था,सामाजीक संस्था,युवक/युवती मंडळे इत्यादी सर्वांना यात सहभागी होता येणार असुन स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात येणार असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मोकळ्या जागा,बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा निवडण्याची मुभा स्पर्धक गटांना राहणार आहे. खाजगी स्थळ,लेआऊट मधील ओपन स्पेस या जागा अपेक्षित नसुन केवळ सार्वजनिक स्थळ अथवा शासकीय जागा असें अपेक्षित आहे. स्पर्धेत नागरिकांनी आपल्या गटासह सहभागी होऊन आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात योगदान देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

 

संपर्क – स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख १० जुलै असुन स्पर्धेत भाग घेण्यास साक्षी कार्लेकर ८३२९१६९७४३, जितेश मुसनवार ८६६८७०८४३५ या क्रमांकावर अथवा मनपा उद्यान विभागात संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. तसेच मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असलेल्या गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येईल.

 

बक्षिसे –

प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

प्रोत्साहनपर – ३ लक्ष रुपयांची ५ बक्षिसे

 

गुणांसाठी निकष : स्पर्धेत गुण प्राप्त करण्यास पर्यावरण पुरक वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे, उद्यान /ओपन स्पेस विकास समितीची स्थापना व कार्ये,सार्वजनिक स्थळ/उद्यानाचे सौंदर्यीकरण,लोकसहभाग,आरोग्यदायी उपक्रम,ओपन स्पेस/ बगिच्याची देखभाल,परिसराची स्वच्छता,केलेल्या कामाची प्रचार प्रसिद्धी,३ आर तत्वांचा वापर,जागेचे आरेखन करणे असे विविध निकष

आहेत.