तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींचा आढावा

तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

 

चंद्रपूर, दि. 24 : शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा आढावा आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., तहसीलदार विजय पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारवेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, या आढावा सभेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न व्हावे. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर आढावा सभा आयोजित करून तेथील नागरिकांच्या तक्रारी सोडवाव्यात. योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते, त्यामुळे गरजू नागरिकांना 24 तासाच्या आत कागदपत्र उपलब्ध करून देण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह उपक्रम राबवावे. तळागाळातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यक्तीला आवश्यक असणारी कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावी ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.

 

जिल्हा परिषदेअंतर्गत 29 विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर विभागाच्या योजनांची एकत्रित माहिती पुस्तिका तयार करून पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर वितरित करावी, जेणेकरून, सर्वसामान्य नागरिकांना योजनांची माहिती मिळू शकेल. अशा सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. समस्या निकाली काढण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बैठक घेण्यात येईल. विकास साधावयाचा असल्यास सर्वसामान्यांना योजनांचा लाभ देणे अपेक्षित आहे. त्यासाठी शासन आपल्या दारी आले आहे. नागरिकांच्या काही समस्या व तक्रारी असल्यास त्याचे तातडीने निरसन करावे असेही ते म्हणाले.

 

सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. म्हणाले, योजना आपल्या दारी पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी पोहोचले आहे. 75 वर्ष उलटूनही काही लोकांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. पण शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सर्वसामान्य व गरजू नागरिकांना कागदपत्रासह विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. ओळखपत्र तथा कागदपत्राअभावी कोणीही लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही यासाठी योग्य ती कारवाई करून योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळवून द्यावा.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ म्हणाले, शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावा हा मानस आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घटकापर्यंत योजना व त्यांची माहिती पोहोचावी यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सरपंच हा गावातील प्रथम नागरिक असल्याने त्यांच्या माध्यमातून योजनांची माहिती गावात पोहोचविण्यास हातभार लागणार आहे. असे ते म्हणाले.

 

विविध योजनांचा आढावा:

 

यावेळी जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा सादर करण्यात आला. यामध्ये पंचायत विभाग, कृषी आरोग्य सिंचन बांधकाम प्रधानमंत्री आवास, आदि विभागांच्या योजनांची माहिती सादर करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार तर आभार कृषी अधिकारी हटवार यांनी मानले.