पाईपचा पुरवठा न झाल्याने खोदलेली जागा बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

पाईपचा पुरवठा न झाल्याने खोदलेली जागा बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

Ø शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याबाबत आश्वस्त राहण्याची ग्वाही

 

चंद्रपूर, दि. 15: गोसेखुर्द प्रकल्पाच्या आसोलामेंढा मुख्य कालव्यावरील येरगाव, खेडी, भेजगाव वितरीका व बाबराला, गडीसुर्ला, बेंबाळ चक, सावली क्र.9,10, 11,11(अ) या लघु कालव्यांचे बांधकाम करारनामा अन्वये मे.पी.व्येंकटा रमानाईया कंपनी हैदराबाद यांना प्रदान केले आहे.

 

बंदनलिका वितरण प्रणालीने 4406 हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रावर सिंचन सुविधा उपलब्ध करून 5776 हे. सिंचन क्षमता निर्मित करणे हे काम जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित होते. सदर कामाअंतर्गत उर्वरित सिंचन क्षमता निर्माण करून शेतकऱ्यांपर्यंत या हंगामात सिंचनासाठी पाणी पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले होते. याअंतर्गत कार्यक्षेत्रावर पाईप टाकण्यासाठी जानेवारी 2023 मध्ये खोदकामास सुरुवात करण्यात आली. दरम्यान कार्यक्षेत्रावर लागणाऱ्या विविध व्यासाच्या पाईपची पाईप फॅक्टरीमध्ये ऑर्डर देण्यात आली. परंतु फॅक्टरीमध्ये काही अपरिहार्य कारणामुळे नियोजित वेळेत पाईपचा पुरवठा होऊ शकला नाही.

 

सदर पाईपचा पुरवठा जून महिन्यात झालेला असून माहे जूनमध्ये पाईप पोहोचल्याने या हंगामात पाईप टाकणे शक्य होणार नव्हते. त्यामुळे शेतकऱ्याचे चालू हंगामात काही नुकसान होऊ नये म्हणून तातडीने विविध लघुकालवे व वितरिका यावर मशीन लावून पाईप टाकण्याकरीता खोदलेली जागा बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ण खोदलेली जागा बुजविण्यात येत आहे. त्यामुळे चालू हंगामात शेतकरी पिके घेऊ शकतील. याबाबत शेतकऱ्यांनी आश्वस्त रहावे, असे सावली, आसोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.