पूर परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करावा…

पूर परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करावा

· आपत्ती विषयक कार्यरत यंत्रणांच्या कामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

भंडारा, दि. 5 : येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार असून बरेचदा पूर परिस्थिती उद्भवते. पूरामुळे विहीर खचणे, त्यातील पाणी दूषित होणे, तसेच अन्य जलस्त्रोतही मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होतात. 2020 व 2022 या वर्षी उद्भवलेल्या पूर परिस्थितीवेळेसचा अनुभव लक्षात घेता यावर्षी पाणीपुरवठा विभागाने पूर परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.

 

आज नियोजन सभागृहात आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे आयोजित मान्सूनपुर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद विवेक बोंन्द्रे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी 27 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्तांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी पीपीटीव्दारे विभागांचे सादरीकरण केले.

 

मान्सूनपूर्व आढाव्यात शहरी व ग्रामीण भागातील नालेसफाई प्राधान्याने पूर्ण करावी. तसेच महावितरणने विजेच्या तारांवर असणाऱ्या झाडांची कापणी करावी व आवश्यक तेथे विद्युत वितरण प्रणालीतील दोष निवारण करण्याची सूचना त्यांनी केली.

 

पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना निवारागृहात हलविण्यात येते. मात्र या निवारागृहात त्यांना पिण्याचे शुध्द पाणी व अन्य मुलभुत सुविधा मिळण्यासाठी स्थानिकस्तरावर तहसीलदारांनी निर्णय घ्यावेत. परिसरातील शाळा महाविद्यालयांच्या प्राचार्याची बैठक घ्यावी. सर्व तहसीलदारांनी गावपातळीवरील आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्यात ग्रामस्थ, अशासकीय संस्थाना समाविष्ट करून घ्यावे. पूर प्रवण पूल व नद्यांच्या धोका पातळीबाबत संदेशाचे फलक तयार करून लावावेत.

 

पूर परिस्थीतीत कमीत कमी वेळेत होमगार्ड उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने कार्यवाही करावी. पुराबाबत तसेच पावसाच्या अलर्टबाबत किंवा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत त्या भागातील लोकप्रतिनीधींना अवगत करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. आरोग्य विभाग व साथरोग नियंत्रण विभागाने त्यांच्या नियंत्रण कक्षाची माहिती माध्यमांव्दारे नागरिकांपर्यंत पोहोचवावी.