जागतिक आदिवासी दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

Ø ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 9 ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा होणा-या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे हस्ते करण्यात आले.

कृषी भवन परिसरात आयोजित या कार्यक्रमास कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, स्मार्ट प्रकल्पाचे मूल्य साखळी तज्ञ गणेश मादेवार, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, उमेद यंत्रणेचे कर्मचारी, महिला व पुरुष शेतकरी गटाचे प्रतिनिधी आणि रानभाजी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील शेतमजूर आणि आदिवासी बांधवांसाठी रानभाजी उत्पादन आणि विक्री हे रोजगाराचे मध्यम होणार आहे. सोबतच शहरी भागातील जनतेस कोणत्याही रासायनिक किटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिक स्वरुपात रानभाज्या उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी त्यांचे हस्ते रानभाज्यांची माहितीपुस्तीका २०२२-२३ चे विमोचन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना श्री. मनोहरे यांनी सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यात ७ दिवस हा रानभाजी महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रानावनात आढळणा-या ३० प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश असून या रानभाज्या आणि त्यापासून खाद्य पदार्थ बनवून ते विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. याद्वारे रानभाज्यांची विक्री व्यवस्था करुन शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे तसेच रानभाज्याचे महत्व प्रसारित करणे व विपणन साखळी निर्माण करणे, हा या महोत्सवाचा उद्देश आहे. शहरी लोकांना रानभाज्यांची ओळख व्हावी आणि त्यांना याचे आरोग्य विषयक फायदे माहिती व्हावे, या उद्धेशाने प्रचार आणि प्रसार करण्यात येणार असल्याबाबत त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन गणेश मादेवार यांनी तर आभार श्री. गायकवाड यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.