वटवृक्ष लागवडीच्या ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री स्‍नेहल राय यांची विशेष उपस्थिती

वटवृक्ष लागवड मोहीम एक जनचळवळ व्हावी

वटवृक्ष लागवड मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई पात्रीकर यांचे आवाहन

वटवृक्ष लागवडीच्या ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री स्‍नेहल राय यांची विशेष उपस्थिती

 

चंद्रपूर. ता.०३:- वडाचे झाड वैशिष्टपूर्ण,आरोग्यवर्धक आणि जल-संवर्धक आहे. विशेष करून स्त्री वर्गासाठी वटवृक्षाचे अध्यात्मिक महत्व देखील आहे. दैनंदिन जीवनात आपण या वडाचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. वटवृक्षाची लागवड एक जन चळवळ व्हावी असं मत ऩटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई पात्रीकर यांनी व्यक्त केले.

ऩटराज निकेतन संस्था, मैत्री परिवार नागपूर आणि चंद्रपूर महानगर पालिकेच्या सहकार्याने “वटवृक्ष रोपण’ मोहीमेचा उदघाटन सोहळा आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी संकुल चंद्रपूर येथे पार पडला त्या वेळी त्या बोलत होत्या. वटवृक्ष लागवड मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे आणि चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल , ऩटराज निकेतन संस्था सचिव मुकुंद विलास पात्रीकर, मधुरा निखिल व्यास, निखिल व्यास, डॉ. भावना ( सलामे ) कुळसंगे, सौ. वृषाली पारखी आणि मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पेंडके यांची उपस्थिती होती.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, ऩटराज निकेतन संस्था ही एक समर्पित संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार, पिण्याचे पाणी अन्य क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहेत. वटवृक्ष लागवड हि मोहीम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करू असा विश्वास असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

तर वटवृक्ष सर्वात अधिक ऑक्सीजन देणारा वृक्ष आहे. त्यांचे लागवड आणि योग्य संवर्धन झाले पाहिजे. त्याकरिता आम्ही सेवाभावनेने कार्य करू, असे मुकुंद पात्रीकर म्हणाले तर राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात वटवृक्ष लागवड एक यशस्वी मोहीम राबविणार असल्याचं मत मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पेंडके यांनी व्यक्त केले.

समाजाच्या कल्याणकारी योजनांचे निश्चितच स्वागत आहे. अश्या कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबविली जावी. त्याकरिता शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. तर वटवृक्ष लागवडीचा नटराज निकेतन संस्था आणि मैत्री परिवार संस्थेचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. चंद्रपूर महानगर पालिका अश्या मोहिमेला नेहमीच प्राधान्य देते. हि मोहीम यशस्वी करण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे आपल्या सोबत असल्याची ग्वाही चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी यावेळी या संस्थांना आणि उपस्थितांना दिली.

वटवृक्ष लागवडीच्या ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेत्री स्‍नेहल राय यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या कार्यात आपण वेळोवेळी सहभागी होऊन, या मोहिमेला सहकार्य करण्याचा मानस अभिनेत्री स्‍नेहल राय यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.

यावेळी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. या मोहिमेत शासन प्रशासन सह देशभरातील ३०० संस्थांचा सहभाग असणार आहेत. यावेळी मंचावर उपजिल्हाधिकारी मा. पल्लवी घाटगे, मनपा उप-आयुक्त अशोक घराटे, तहसीलदार कांचन जगताब, विभागीय वन अधिकारी शुभांगी चव्हाण, गोपाल मुंदडा, चंद्रशेखर गन्नुरवार, किरमेजी , गेडाम मॅडम, इको- प्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांच्यासह नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा सौ. मंगलाताई पात्रीकर, सचिव मुकुंद विलास पात्रीकर, मधुरा निखिल व्यास, निखिल व्यास, डॉ. भावना ( सलामे ) कुळसंगे, सौ. वृषाली पारखी, मैत्री परिवार संस्थेचे प्रमोद पेंडसे सर, दिलीप ठाकरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. मधुरा व्यास यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भावना (सलामे ) कुळसंगे यांनी केले .