मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतींमध्ये लागणार शिलाफलक

मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील
५४१ ग्रामपंचायतींमध्ये लागणार शिलाफलक
* देशासाठी बलिदान विरांना आदरांजल
*ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलकांची उभारणी

भंडारा दि. 8 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून ९ ऑगस्टपासुन सुरु होत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायत मध्ये शिलाफलक उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली .
स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक उभारण्यात येणार असल्याची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्षभर अमृत महोत्सव साजरा होत आहे. या अमृत महोत्सवाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाने होत आहे. हा उपक्रम देशपातळीवर राबविण्यात येत आहे.‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम दिनांक ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. दिनांक ९ ऑगस्ट रोजी या उपक्रमांतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. हा उपक्रम विभागातील सर्व शासकीय कार्यालय, जिल्हा परिषद , पंचायत समिती, महानगरपालिका, नगर पालिका, नगर पंचायत व ग्रामपंचायत स्तरापर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश या उपक्रमासोबतच स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी बलिदान दिलेल्या विरांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील शालेय प्रांगणात शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. शाळेतील दैनंदिन प्रार्थनेनंतर शहीदांच्या शौर्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती होईल तसेच हुतात्मा दिन सन्मानपूर्वक साजरा करण्यात येईल. या मोहिमेला बुधवार दिनांक 9 ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात सुरुवात होईल. यावेळी पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
सर्व ग्रामपंचायतींमध्ये अमृत वाटीकेसाठी जागा निवडण्यात आली असून प्रत्येक अमृत वाटीकेत ७५ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायतीमधून माती गोळा करुन तालुकाच्या ठिकाणी एक कलश तयार करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यामधून हा अमृत कलश घेऊन जाण्यासाठी युवकांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमांसोबतच हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत तिरंगा झेंडा फडकविण्याबाबत मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी तिरंगा झेंडा उपलब्ध होईल यादृष्टिने जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री. कुंभेजकर यांनी दिली.