तांत्रिक कारणासाठी प्रकरण प्रलंबित न ठेवता व्हिडिओ कॉलद्वारे पडताळणी करून प्रकरणाचा केला निपटारा

लोक अदालतीमध्ये न्यायालयाने धरली आधुनिक तंत्रज्ञानाची कास

Ø तांत्रिक कारणासाठी प्रकरण प्रलंबित न ठेवता व्हिडिओ कॉलद्वारे पडताळणी करून प्रकरणाचा केला निपटारा

चंद्रपूर, दि. 13: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुक्यातील न्यायालयात 9 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. या लोकअदालतीत तब्बल 2 हजार 679  प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रकरणात न्यायालयाने तंत्रज्ञानाची कास धरली. चंद्रपुरातील अर्जदार पत्नी व कश्मीरमधील गैरअर्जदार पती यांच्यामध्ये कौटुंबिक कलहातून चंद्रपूर जिल्हा न्यायालयात खटले सुरू होते. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकन्यायालयातील पॅनल क्रमांक-1 समोर सदर दाम्पत्यांच्या अनेक खटल्यांपैकी एक फौजदारी अपील तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड झाली मात्र, पडताळणीच्या वेळी गैरअर्जदाराच्या उपस्थितीचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी पॅनल प्रमुख जिल्हा न्यायाधीश भगवान फड यांनी गैरअर्जदाराच्या वकीलांचे भ्रमणध्वनीवरून काश्मीर येथे राहत असलेल्या गैरअर्जदाराशी व्हाट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून तडजोडीचे मुद्दे समजावून सांगितले व पडताळणी केली.

जिल्हा न्यायाधीशांनी सदर प्रकरण तांत्रिक कारणासाठी प्रलंबित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्हिडिओ कॉलद्वारे पडताळणी करून प्रकरणाचा निपटारा केला. यामुळे दोन्हीकडील पक्षकार, वकील तसेच उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पांडूरंग भोसले, पॅनल सदस्य ॲड. विनोद बोरसे, अर्जदाराचे वकील एम. एच. अली तसेच गैरअर्जदाराचे वकील आर. बी. इंगळे यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.