बाह्य रुग्ण तपासणी केंद्रांना (OPD Clinic) मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक

बाह्य रुग्ण तपासणी केंद्रांना (OPD Clinic) मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक

 

चंद्रपूर १० एप्रिल – चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात जितके बाह्य रुग्ण तपासणी केंद्र (OPD Clinic) कार्यरत आहेत त्यांना मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक असुन या तपासणी केंद्रांची नोंदणी लवकरात लवकर करण्याच्या सूचना मा. जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यासंबंधी आढावा बैठक मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजीत करण्यात आली होती.

शहरात ॲलोपॅथी,होमिओपॅथी,आयुर्वेद,युनानी,डेंटल पद्धतीने उपचार देणारे अनेक बाह्य रुग्ण तपासणी केंद्र (OPD Clinic) आहेत ज्यांनी मनपाकडे नोंदणी केलेली नाही. अश्या सर्व तपासणी केंद्रांना नोंदणीकृत करणे अनिवार्य असुन याकरीता मनपा आरोग्य विभागात संपर्क साधता येईल.

शहरातील सर्व बाह्य रुग्ण तपासणी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा दरदिवशी निर्माण होतो. केंद्रात तयार होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट ही शास्त्रोक्त पद्धतीने लावणे ही त्या केंद्राची जबाबदारी असून शास्त्रोक्त पद्धतीने जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास सदर केंद्रावर कारवाई करण्यात येणार आहे.

याप्रसंगी सर्व बाह्य रुग्ण तपासणी केंद्रांना(OPD Clinic) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. तरी मनपा हद्दीतील सर्व बाह्य रुग्ण तपासणी केंद्र यांनी मनपा तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.