प्रशासनाने नागरिकांच्या दारात जावून समस्यांची माहिती घ्यावी – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

प्रशासनाने नागरिकांच्या दारात जावून समस्यांची माहिती घ्यावी

– पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

Ø पालेबारसा येथे “समस्यामुक्त गांव अभियानाचा’ शुभारंभ

Ø गावात फिरून नागरिकांशी साधला संवाद

Ø  समस्यांचे जागेवर निराकरण झाल्याने नागरिकांचे समाधान

चंद्रपुर, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेडयाकडे चला” असा संदेश दिला. मात्र, आजच्या स्थितीमध्ये लोक गावाकडून शहराकडे धाव घेत आहे. त्यामुळे गावांचा विकास खूंटला असून महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी गावांच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याच उद्देशाने गांधी जयंती निमित्त “समस्यामुक्त गांव” अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने गावातील नागरिकांच्या दारात जावून समस्यांची माहिती घ्यावी आणि त्याचे त्वरीत निराकरण करावे, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
सावली तालुक्यातील पालेबारसा येथे “समस्यामुक्त गांव” अभियानाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी  मंचावार जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, राजू सिद्धम आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी गावात नागरिकांच्या घरापर्यंत जावून त्यांच्याशी संवाद साधला. गावातील समस्यांचे जागेवर निराकरण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, गावातील लोक अतिशय हालाकीच्या अवस्थेत राहतात, या वेदना जाणून घेण्यासाठी व गावातील समस्या सोडविण्यासाठी संपूर्ण प्रशासन आज येथे आले आहे.
परिसरातील गावाच्या विकासासाठी आराखडा मंजूर करण्यात आला आहे. रस्ते, पूल, तलाठी कार्यालय, शाळांचे संरक्षण भिंत, विविध गावात अंगणवाड्यांचे बांधकाम, नळयोजना आदींसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच सिंचनासाठी या परिसराला 106 कोटी नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यात, ब्रह्मपुरी क्षेत्रात सर्वाधिक सिंचनाची सोय नागरिकांना उपलब्ध झाली आहे. महाज्योती मार्फत जवळपास 5 हजार शेतकऱ्यांना मोफत करडई बियाणे देण्यात येईल. तसेच मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तालुक्‍यातील 890 शेतकऱ्यांना सोलर फेंसिंगसाठी निधी देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक गावाला 25 लक्ष रुपये देण्याचे नियोजन आहे.
तालुक्यात 1192 नागरिकांना प्रधानमंत्री आवास-ड योजनेअंतर्गत एक महिन्यात मंजुरी मिळेल. या परिसरात कार्पेट क्लस्टरसाठी 8.50 कोटी रुपये देण्यात आले असून यातून 1200 महिलांना रोजगार मिळणार आहे. सिंचनाच्या उपलब्धतेमुळे धान उत्पादनाबरोबरच येथील शेतकरी दूध उत्पादक होईल. पुढील दोन वर्षात 10 हजार शेतकऱ्यांच्या दारात दुधाचे उत्पन्न सुरू होईल. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना रोवण्यासाठी थेट निधी देण्याचा प्रस्ताव आहे.
ब्रह्मपुरी क्षेत्रात 87 हजार हेक्‍टरवर सिंचनाची सोय झाली असून 2007-08 मध्ये राज्यमंत्री असताना गोसेखुर्द साठी 5 हजार कोटींचा निधी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिला होता. तसेच उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्यावर आपला भर असून समस्या मुक्त गाव करण्यासाठी आणखी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  यावेळी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या “समस्यामुक्त गाव अभियान” या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासन सावली तालुक्यातील पालेबारसा येथे आले आहे. स्थानिकांच्या समस्या गावातच सोडवण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश असून सावली तालुक्यात 16,300 लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत 1.75 कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. तसेच या तालुक्यात नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदांना 2.31 कोटी रुपये देण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थांना फायर फायटिंगसाठी 1.28 कोटी रुपये तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
15 ऑगस्टपासून राज्यशासनाने ई-पीक पाहणी सुरू केली असून शेतकऱ्यांनी स्वतः ई-पीक पाहणी करून आपल्या पिकाची नोंदणी करावी. तसेच गांधी जयंतीनिमित्त आजपासून शेतकऱ्यांना घरपोच सुधारित सातबारा देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबातील कुटुंबीयांना 10 लक्ष रुपयाचा धनादेश अनिल मस्के यांना देण्यात आला. तसेच सौर कुंपण योजनेअंतर्गत दादाजी लोनबले, उमाकांत धुंदाळे, गॅस वितरण योजनेअंतर्गत जनार्दन चौधरी, उमाकांत दुळसे, पांडुरंग देवाजी तर बेबी केअर किट विद्या आत्राम, पोर्णिमा कावळे, आराध्या गेडाम, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विठ्ठल कावळे, घरपोच सातबारा अंतर्गत रमेश खेडेकर, प्रकाश खेडेकर, विलास कावळे, विलास मडावी, नामदेव खेडेकर या लाभार्थ्यांना सदर योजनांचा लाभ देण्यात आला.
यावेळी तालुका प्रशासनाला प्राप्त तक्रारींचे पालकमंत्र्यांनी तात्काळ निराकरण करून जागेवरच समस्या मार्गी लावल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, विद्युत विभाग, महसूल विभाग आदी विभागांना नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याचे निर्देश दिले. तसेच काही समस्यांचे पालकमंत्र्यांनी जागेवरच निराकरण केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.